कोणतीही लक्षणे नसली तरी चाचणीमध्ये करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालेल्या रूग्णांसाठी रत्नागिरीच्या सामाजिक न्याय भवनात नवीन सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

बाहेरगावाहून येणाऱ्या चाकरमानींमुळे रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. मात्र त्यापैकी अनेकांना या रोगाची काहीच पूर्वलक्षणे दिसत नाहीत. चाचणी अहवाल आल्यानंतरच ते करोनाबाधित असल्याचे उघड होते. अशा रूग्णांना फार मोठय़ा उपचारांची गरज नसते.

म्हणून त्यांना नियमित वैद्यकीय निगराणीखाली या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दरम्यान  सोमवारी प्राप्त झालेल्या चाचणी अहवालांपैकी १८ पॉझिटीव्ह अहवालांमुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या २८७ वर पोचली आहे.

नवीन रूग्णांपैकी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात ७, कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात ८, राजापूर २, तर गुहागर ग्रामीण रूग्णालयात १ रुग्णावर उपचार चालू आहेत.

परजिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झालेल्यांची संख्या १ लाख १० हजार झाली आहे. त्यापैकी ८२ हजार ४४९ जणांना घरीच अलगीकरण करून ठेवले आहे.