राज्यात नवे सरकार स्थापन होण्यास आणखी आठ-दहा दिवसांचा अवधी लागेल. यासाठी प्रयत्न सुरू असून उद्या दिल्लीत नव्या सरकारच्या स्थापनेबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी बैठक होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केली.

आ. पाटील म्हणाले की, राज्यात महाशिवआघाडीची सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असून चर्चेच्या पातळीवर अद्याप प्रक्रिया सुरू असून यासाठी अजूनही आठ ते दहा दिवसांचा अवधी लागू शकतो.

राज्यात सरकार स्थापन करण्याच्या ज्या हालचाली सुरू आहेत, त्याबाबत आताच आपण स्वप्न बघणे योग्य नाही ,असे सांगून आ. पाटील यांनी आपले सरकार येणार आहे, या आनंदात राहू नका आणि नाही आले म्हणून दुखही करू नका, असे सांगत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला.

जर राज्यात सत्ता स्थापनेबाबत वेगळे काही घडले तरी सक्षम विरोधक म्हणून आम्ही काम करण्यास समर्थ आहोत. राजकीय पातळीवर बऱ्याच घडामोडी घडत असतात यामुळे राजकारणात कशावरही विश्वास ठेवायचा नसतो, असेही ते म्हणाले.

राज्यातील राजकीय स्थितीवर सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यात चर्चा झाली असून सरकार स्थापनेबाबतची दोन पावले पुढे पडली आहेत. मंगळवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक होईल. या बठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा होउन राजकीय घडामोडी वेगवान होतील. तरीही नवे सरकार स्थापनेबाबत अजूनही आठ-दहा दिवसांचा कालावधी लागेल असेही त्यांनी सांगितले.