भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपातील सुंदोपसुंदी बाहेर येऊ लागली आहे. पुढे काय करायचं याचा विचार करण्यासाठी वेळ द्या आणि १२ डिसेंबरला आपण निर्णय सांगू असं पंकजा म्हणाल्या आहेत. विशेषतः भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंच्या पराभवामागे पक्षातील लोक असल्याचा दावा केला आहे. दोघांच्याबरोबर आता माजी मंत्री प्रकाश मेहताही नाराज असून, खडसे आणि मेहता गोपीनाथ गडावर हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजांच्या नेतृत्वाखाली नवा गट उदयास येण्याची शक्यता आहे.

सत्तेवरून पायउतार झालेल्या भाजपातील काही नेते बंडाचे हाती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. भाजपाच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडूनही अनेकवेळा टीका झाली आहे. मात्र, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंकजाच नाही, तर भाजपाचे अनेक बडे नेते संपर्कात असल्याचं सांगितल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन “पंकजा मुंडे असा काही निर्णय घेणार नाही,” असा खुलासा करावा लागला.

आणखी वाचा – “पक्षातील लोकांमुळेच पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव”

त्यामुळे यावरची चर्चा थांबण्याची चिन्ह दिसत असतानाच “पक्षातील काही लोकांनी कुरघोड्या करुन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांना पाडलं आहे. रोहिणी खडसे यांचा त्यामुळेच पराभव झाला. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचंही असंच म्हणणं आहे,” असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. “पक्षाच्या उमेदवारांविरोधात कुरघोड्या करणाऱ्या अशा लोकांची नावं पुराव्यासहित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे,” असंही ते म्हणाले. त्याचबरोबर १२ डिसेंबरला आपण गोपीनाथ गडावर जाणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं.

आणखी वाचा – पक्षांतराच्या चर्चेवर पंकजा मुंडे यांचे मौन

पंकजा मुंडे यांच्याबरोबर विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे हे नेतेही तिकीट कापण्यात आल्यामुळे पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर नाराज आहेत. त्यावर प्रकाश मेहता यांनी प्रथमच भाष्य केलं आहे. पक्षश्रेष्ठीकडं आपली भूमिका मांडली आहे. त्यातून प्रश्न सुटतील असं त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे प्रकाश मेहताही गोपीनाथ गडावर जाणार असल्याचं बोललं जात आहेत. आता पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार आणि त्यात एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता यांचा किती सहभाग असेल, याविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.