नव्या महापौराच्या निवडीसाठी दि. ८ जूनचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. विभागीय महसूल आयुक्तांनी शुक्रवारी सायंकाळी याबाबतचा आदेश जारी केला. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर महानगरपालिकेच्या प्रशासनाने विभागीय महसूल आयुक्तांना नव्या निवडीबाबतचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार दि. ८ जूनला ही निवड करण्यात येणार आहे.
मनपातील सत्ताधारी राष्ट्रवादीने काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मित्रपक्षांच्या मदतीने पुन्हा सत्तेची गणिते मांडली आहेत. त्यांच्याकडून महापौरपदासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांचे पुतणे अभिषेक कळमकर यांचे नाव निश्चित मानले जाते. विरोधी शिवसेनेनेही या निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी सचिन जाधव यांचे नाव निश्चित केले आहे. भारतीय जनता पक्षाशीही त्यांनी चर्चा केली असून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर सध्या शहरात तळ ठोकून आहेत. मनपातील संख्याबळ लक्षात घेता भाजप-शिवसेना युतीला किमान सात नगरसेवकांची जुळवाजुळव करावी लागेल. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे. यानिमित्ताने मनपात पुन्हा घोडेबाजाराची चिन्हे दिसू लागली असून येत्या एक-दोन दिवसांत दोन्ही बाजूचे नगरसेवक सहलीला रवाना केले जातील.