नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण होणार असून, २०१९ मध्ये या विमानतळावरून विमान नक्की उडेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. संजय दत्तसह इतर सदस्यांनी सादर केलेल्या लक्षवेधीवर त्यांनी १४ हजार ५७३ कोटी रुपयांचा हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि ९१ टक्के  लोकांनी संमतिपत्र दिले आहे. उर्वरित लोकही संमतिपत्र देण्याच्या तयारीत असून सर्व अडथळे दूर झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी
सांगितले.
पर्यावरणाचे अडथळे आणि पुनर्वसन आक्षेप यावर संजय दत्त यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणाचे उर्वरित अडथळे नवी दिल्ली येथे अलीकडेच झालेल्या बैठकीत दूर झाले. आता पर्यावरणाची काहीही अडचण नाही. पुनर्वसितांना दिलेले साडेबावीस टक्के  विकसित जमिनीचे अतिशय चांगले पॅकेज देण्यात आले आहे.
उर्वरित चार-पाच टक्के लोकांनी याला विरोध केला असला तरीही तोसुद्धा लवकरच मावळेल, असे त्यांनी सांगितले. या पुनर्वसितांसाठी पुष्पकनगर आणि गावठाणमधील लोकांसाठी तीन शहरे वसविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात चांगला अभ्यास केल्याचे सांगून जयंत पाटील यांनी त्यांची शाब्दिक पाठ थोपटली. मात्र, त्याच वेळी या नव्या प्रकल्पामुळे मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून स्थानिकांना त्यात प्राधान्य द्या आणि त्यांना कामाचे प्रशिक्षण द्या, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकल्पाच्या टेंडरसंदर्भात माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला टेंडर प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगितले.
 सिडकोने हाती घेतलेल्या ‘नैना’ या प्रकल्पासंदर्भात सुनील तटकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रकल्पात कुणालाही जमीन संपादित करावी लागणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘लॅण्ड पुलिंग पॅटर्न’मध्ये सहभागी होण्यासाठी लोक समोर येत असल्याचेही ते म्हणाले. यात शेतकऱ्याचे कोणतेही नुकसान नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पावर संपूर्णपणे राज्याचेच नियंत्रण राहील, असेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.