सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्य़ाचा टाटा कन्सल्टन्सी या खाजगी कंपनीने बनविलेला पर्यटन आराखडा कालबाह्य़ झाल्याने पुन्हा नव्याने खाजगी कंपनीकडून पर्यटन आराखडा बनविला जात आहे. हा आराखडा सूचना व हरकतींसाठी जनतेसमोर ठेवला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा १ एप्रिल १९९७ मध्ये पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर १९९९ मध्ये टाटा कन्सल्टन्सी या खाजगी कंपनीमार्फत जिल्ह्य़ाचा पर्यटन विकास आराखडा बनविण्यात आला होता. मात्र हा आराखडा आता कालबाह्य़ मानला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या २२ पर्यटन स्थळांचा विकास टाटा कन्सल्टन्सीने सुचविला होता. पण प्रत्यक्षात जिल्ह्य़ात विविधांगी पर्यटन स्थळे आहेत. त्याचा आराखडय़ात समावेश नव्हता त्यामुळे १६ वर्षांत जिल्ह्य़ाचा पर्यटन विकास कासवगतीने झाल्याचे मानले जाते.
जिल्ह्य़ात पर्यटन स्थळे आहेत पण त्या स्थळांचा विकास नाही, पायाभूत सुविधा व रस्त्यांची वानवा त्यामुळे नव्याने सिंधुदुर्ग पर्यटन आराखडा बनवून तो जनतेसमोर ठेवून हरकती व सूचना घेऊन सुधारित आराखडा शासनाकडे मंजुरीस पाठविला जाईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मरीन पार्क, विमानतळ, सीवर्ल्ड, बंदर विकासाला चालना मिळत आहे. सागरी पर्यटन, इको व कृषी टुरिझम, थंड हवेचे ठिकाण अशा विविध पर्यटन स्थळांचा आराखडा बनवून जिल्ह्याच्या निसर्गसौंदर्याला पायाभूत सुविधा देण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग पर्यटन आराखडा एक खाजगी कंपनी बनवीत आहे. हा आराखडा लवकरच लोकांसाठी खुला करण्यात येईल असे सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 3:06 am