कोणतीही दरवाढ अथवा नव्या योजना प्रस्तावित न करता ४७३ कोटी खर्चाचे सांगली महापालिकेचे अंदाजपत्रक शुक्रवारी स्थायी समितीला सादर करण्यात आले. २६ लाख रुपये शिल्लक दर्शविणाऱ्या अंदाजपत्रकात शासकीय अनुदानाच्या भरवशावर जुन्याच विकासकामांचा डोलारा उभारण्यात आला आहे.
महापालिकेचे आयुक्त अजिज कारचे यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बठकीत पुढील वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी वर्षांत १४७ कोटीचे महसुली उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. याशिवाय विविध शासकीय निधीतून विकासकामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.  शहरात असलेल्या ४५ चौकापकी महापालिकेने स्वखर्चातून ७ चौकांचे सुशोभीकरण केले आहे. तर खासगीकरणातून १४ चौकांचे यापूर्वी सुशोभीकरण झाले आहे. आगामी वर्षांत नव्याने २५ चौकांचे सुशोभीकरण खासगीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मिरजेतील गणेश तलाव, सांगलीतील काळी खण याचा विकास पर्यटन समोर ठेवून करण्याचा प्रस्ताव नव्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे.
शहरातील प्राथमिक शिक्षण मंडळाकडे असणाऱ्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ५० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील वाहतुकीची होणारी कोंडी दूर करण्यासाठी ट्रक टर्मिनस उभारण्याचा जुनाच प्रस्ताव नव्याने मांडण्यात आला आहे.  स्थानिक संस्था कर लागू केल्यानंतर महापालिकेच्या आíथक स्थितीवर गंभीर परिणाम झाले आहे. त्याचे पडसाद आगामी अर्थसंकल्पात दिसून येत असून केवळ शासकीय अनुदानाच्या कुबडय़ांचा आधार घेत ४७३ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरून २६ लाख रुपये शिल्लक दर्शविण्यात आली आहे.