नोंदणी करून ठराविक वेळेत दर्शन मिळणार

शिर्डीत साईदर्शनासाठी भाविकांना तासन्तास दर्शनबारीत आता उभे राहण्याची आवश्यकता उरली नसून, शिर्डीत  येणाऱ्या भाविकांना पाहिजे त्या वेळेत मोफत नोंदणी करून अवघ्या काही मिनिटांत दर्शन मिळणार आहे. दहा काउंटर्स त्यासाठी सुरू केले आहेत. या दर्शनव्यवस्था यंत्रणेचा शुभारंभ आज सोमवारी सकाळी साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आला.

शिर्डीतील साई मंदिर परिसरातील जुन्या प्रसादालयाच्या इमारतीत बायोमेट्रिक बेस फ्री अ‍ॅक्सेस कार्ड, टाइम स्लॉट केंद्राचे उद्घाटन साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी साई संस्थानचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रशेखर कदम, विश्वस्त प्रताप भोसले, सचिन तांबे, माजी खासदार तथा विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, बिपीन कोल्हे, कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

या बाबत माहिती देताना संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे म्हणाले, की शिर्डीत येणाऱ्या भाविकांना नेहमी तासन्तास भाविकांना दर्शनरांगेत उभे राहावे लागत होते. त्यामध्ये वृद्ध, लहान बालके, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे कोणत्याही गर्दीविना किंवा विनात्रास दर्शनाची कल्पना समोर आली. त्यातून तिरुपती बालाजीच्या धर्तीवर शिर्डीतही वेळेत दर्शन अथवा टाइम दर्शनव्यवस्था आजपासून सुरू करण्यात आली. शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक भाविकास आपल्या दर्शनाची नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे. त्यासाठी संस्थानचे भक्तनिवास, मंदिर, प्रसादालय परिसरात अशी दर्शन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी भविष्यात बसस्थानक, रेल्वेस्थानकावर ही सुविधा संस्थानच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे. यामध्ये भाविकांचे छायाचित्र काढले जाणार व त्यानंतर त्याचे नाव घेऊन त्यांना एक टोकन दिले जाणार आहे. तसेच त्यावर त्या भाविकाची दर्शन वेळ दिली जाणार आहे.  यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.

अमरावतीचा भाविक पिहला मानकरी

शिर्डीत जुन्या प्रसादालयात वेळेत दर्शन नोंदणीच्या काऊंटरचे उद्घाटन झाल्यानंतर पहिले साईभक्त म्हणून अमरावतीचे शरद दातेराम यांना वेळेत दर्शन पास देण्यात आला. त्यांनी भाविकाभिमुख सेवा देणारे संस्थान असल्याची प्रतिक्रिया दिली असून, आनंदही व्यक्त केला आहे.