राज्यातील करोना रुग्णांची संख्या दररोज नवा उच्चांक नोंदवत आहेत. गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ८९० रुग्ण आढळून आले असून, मागील चार दिवसात तिसऱ्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे करोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून आज दुसऱ्यांदा सर्वाधिक रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मागील २४ तासातील करोना स्थितीची आकडेवारी जाहीर केली. “राज्यात आज (२३ जून) ३ हजार ८९० करोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या आता १ लाख ४२ हजार ९०० अशी झाली आहे. आज नवीन ४ हजार १६१ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ७३ हजार ७९२ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६२ हजार ३५४ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत”, असं टोपे यांनी सांगितलं.

२९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे १५ दिवसानंतर १५ जून रोजी ५०७१ इतके रुग्ण बरे होऊन एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आज त्यानंतर पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.

“राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टिव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर कायम आहे,” असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.