कोल्हापूर महापालिका परिवहन विभागाच्या (केएमटी) सेवेत अवघ्या पाच दिवसांपूर्वी दाखल झालेल्या नव्या कोऱ्या बसची चाके निखळून पडण्याचा प्रकार सोमवारी दुपारी शिये गावाजवळ घडला. या बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करीत होते. दुर्दैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडला असल्याचे केएमटीच्या कार्यशाळा अधिका-यांचे म्हणणे आहे.
केएमटीची बससेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी प्रोटोटाईप प्रकारच्या आधुनिक बसेस सेवेत घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २० तर अलीकडेच २५ बसेस दाखल झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात दाखल झालेल्या ताफ्यातील एक बस (क्र. एमएच ०९ सीव्ही ४१५) ही सोमवारी दुपारी क्रांतिवीर नाना पाटील नगरातून वडगांवकडे निघाली होती. शिये गावाजवळील रामनगर बसथांब्याजवळ ती थांबली होती. त्यामध्ये उतारूंना घेऊन बस काही अंतर पुढे धावू लागली. तेव्हा डाव्या बाजूच्या चाकांतून आवाज येऊ लागला. थोडय़ाच वेळात दोन्ही चाके निखळून रस्त्याकडेला जाऊन पडली. हा अपघात गंभीर स्वरुपाचा असला तरी कोणालाही दुखापत झालेली नाही. केएमटी प्रशासनाने मात्र या प्रकारावर पांघरुण घालण्याची भूमिका घेतली आहे. या बसचे नट बोल्ट ढिले झाल्याने चाके निखळून पडली असे कार्यशाळा विभागाचे प्रमुख एम. डी. सावंत यांचे म्हणणे आहे.