(आनंद जोगळेकर)
पुणे येथील पीवायसी क्लबच्या सभागृहात ओडिसाच्या नामवंत, तसेच ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या लेखिका डॉ. प्रतिभा राय यांच्या ‘महामोह’ या ओडिया कादंबरीचा मराठी अनुवाद त्याच ‘महामोह’ नावाने पुरंदरे प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला. या प्रकाशन समारंभासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अध्यक्षस्थानी होते. डॉ. प्रतिभा राय प्रमुख पाहुण्या म्हणून स्वत: जातीने उपस्थित होत्या. वंदना भाले प्रमुख वक्त्या होत्या. त्यांच्याबरोबर अनुवादिका राधा जोगळेकर व प्रकाशक अमृत पुरंदरे होते. प्रकाशन समारंभास अनेक मराठी दैनिक वर्तमानपत्रांचे संपादक, पत्रकार उपस्थित होते. त्याबरोबरच समारंभासाठी अनेक साहित्यिक व सृजन मंडळी उपस्थित होती.
मुख्य वक्त्या वंदना भाले यांनी त्यांच्या भाषणात इंद्र, गौतम आणि अहल्येवर मराठीत अशी  कादंबरी प्रथमच येत आहे आणि या कादंबरीने मराठी साहित्य आणखी समृद्ध केली आहे, असे सांगितले. अनुवाद अतिशय सुंदर आणि नेटका झाला आहे असे सांगून अनुवादिकेने जास्तीत जास्त ओडिया साहित्य मराठीत आणावे अशी आशा व्यक्त केली. अनुवादिका राधा जोगळेकर गेली ३८ वष्रे ओडिसात राहून, ओडिया भाषा शिकून, आपल्या पतीची प्रेरणा मिळाल्याने अनुवाद करायला लागल्याने, त्या अनुवादासंबंधीचे त्यांचे अनुभव त्यांनी कथन केले. अहल्येबाबत आपल्या सगळ्यांनाच असलेली अपुरी माहिती आणि असलेले गरसमज दूर व्हावेत म्हणून ही कादंबरी अनुवादासाठी मी निवडली असेही त्या म्हणाल्या. प्रमुख पाहुण्या डॉ. प्रतिभा राय आपल्या भाषणात म्हणाल्या, की अहल्या, गौतम आणि इंद्राला वेदकालातच सीमित ठेवणे बरोबर नाही. कारण सध्याही समाजात या तीनही जणांची उपस्थिती आपल्याला आढळते. स्त्रीमुक्तीचे त्यांनी ठामपणे समर्थन केले.
अध्यक्ष बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रादेशिक भाषांचा जितका जास्तीत जास्त अनुवाद होईल तितक्या त्या भाषा समृद्ध होतील असे आपले मत प्रकाशित केले. तरुण लेखकांनी आपल्या साहित्याबरोबरच अनुवादाचेही काम करावे यावर त्यांनी भर दिला.  थेट अनुवादावरही त्यांनी जोर दिला. प्रकाशक अमृत पुरंदरे यांनी आभार मानले.
डॉ. माधव जनार्दन रटाटे यांना राष्ट्रपती सन्मान प्रदान
(डॉ. प्रमोद जोशी)
डॉ. माधव जनार्दन रटाटे यांना राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून सन २०१४ चा राष्ट्रपती सन्मान (महर्षी बादरायण व्यास सन्मान) दिला गेला. हे सन्मान संस्कृत भाषेच्या युवा विद्वानांना युवा प्रतिभेच्या प्रोत्साहनासाठी दिले जातात. ह्य़ा वर्षी भारताच्या चार युवा संस्कृत विद्वानांना हे सन्मान प्रदान केले गेले. डॉ. माधव जनार्दन रटाटे काशी हिन्दू विश्वविद्यालयात संस्कृत विद्या धर्मविज्ञान संकायमध्ये धर्मशास्त्र मीमांसा विभागात सन् २००६ पासून असिस्टंट प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९७५ साली विद्वानांच्या घराण्यात झाला. त्यांचे वडील वै.वा. डॉ. जनार्दन गंगाधर रटाटेदेखील संस्कृतचे प्रतिष्ठित विद्वान होते. डॉ. माधव जनार्दन रटाटे यांनी १९९७ साली काशी हिन्दू विश्वविद्यालयात एमए संस्कृतच्या परीक्षेत सर्वोच्च स्थान व सुवर्ण पदक प्राप्त केले होते. आजपावेतो त्यांनी १६ ग्रंथांचे लेखन/संपादन केले आहे. त्यांना पुस्तक मीमांसादर्शनविमर्श’साठी उत्तर प्रदेश संस्कृत संस्थानद्वारे विविध पुरस्कार मिळाले आहेत. सुमारे ३५ शोधपत्र, लेख व कविता अनेक राष्ट्रीय, अंतर्राष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित आहेत. वाराणसीत अनेक सामाजिक संस्थेत हे प्रमुख पदावर आहेत. सध्या मीमांसादर्शनाच्या आधुनिक उपयोगितेवर त्यांचे शोधकार्य चालू आहे.

हरिद्वार-महाराष्ट्र मंडळ  नवीन कार्यकारिणी
(वसंत बुधकर)
हरिद्वार. चत्र प्रतिपदेला हरिद्वारला महाराष्ट्र मंडळाची बठक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित झाले. त्यात वरिष्ठ सदस्यांचा सत्कार करून त्यांना स्मृतिचिन्ह दिले गेले. ह्य़ाच वेळी महाराष्ट्र मंडळाची नवीन कार्यकारिणी पण घोषित झाली. त्यात श्री. बिऱ्हाडे यांना सर्वानुमते अध्यक्ष नेमण्यात आले. त्यांच्याबरोबरच मनोज शेखरदार, अमित वैद्य, अंजली टिकले, ज्योती सोळापूरकर, कल्पना पाडगांवकर, प्रीति शेकडे यांची कार्यकारिणीसाठी घोषणा झाली. याच कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष प्रशांत महाडिक यांचा सन्मान करण्यात आला. प्रशांत महाडिक सीआयआयचे उत्तर भारताचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. प्रशांत महाडिक आयटीसी हरिद्वारचे जनरल मॅनेजर आहेत.

डॉ. रामचंद्र पारनेरकर जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम
डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. इंदूर येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे नुकतेच डॉ. विष्णुमहाराज पारनेरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन झाल्यानंतर पालखी, ग्रंथदिंडी, शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबादचे पूर्णवाद युवा फोरमचे ढोल पथक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.  या प्रसंगी सुरेशदादा तळवळकरांच्या १२ पखवाजवादक शिष्यांचे वादन व इंदूरच्या कथ्थक नृत्यांगनाच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सांगीतिक विषयावरील ‘खयाल’ या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. या समारंभात डॉ. रामचंद्र महाराजांची इंदूर जन्मभूमी असल्याने येथे त्यांची मूर्ती व महाद्वार उभारले जाणार आहे. तसेच वर्षभरात देशातील प्रमुख १६ शहरांमध्ये चार दिवसांचा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या निमित्ताने डॉ. रामचंद्र महाराजांच्या १०० शिष्यांचे चरित्रग्रंथ प्रकाशित केले जाणार आहेत. तसेच चांदीचे स्मृती नाणेही प्रकाशित करण्यात येणार आहे.