मित्र करोनाबाधित निघाल्याने आपल्यालाही करोना झाला असेल? या भीतीनेच गेवराईतील पत्रकार संतोष भोसले यांचा मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वी करोनाची चाचणी नकारात्मक आलेली असतानाही बाधित मित्राबरोबर फिरल्याची भीती मनात कायम राहिल्याने चार दिवसांपासून ते अस्वस्थ होते. यातच रात्री उशिरा प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, २५ वर्षांपासून अधिक काळ एकाच वर्तमानपत्रात तालुक्यात काम करणारा सुस्वभावी पत्रकाराच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले मागील काही दिवसांपासून आपल्या मित्राबरोबर शहरात फिरत होते. आठ दिवसापूर्वी सोबतच्या मित्राला करोनाची बाधा झाल्याचे तपासणीत उघड झाले. परिणामी आपल्यालाही लागण झाली असेल या भीतीने ते अस्वस्थ झाले. दोन दिवसापूर्वी त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आल्यानंतर अहवाल नकारात्मक आला. तरीही ताप आणि अंगदुखीची लक्षणे दिसू लागल्याने ते अधिकच अस्वस्थ होत गेले. सोमवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवार दि. 28 जुलै रोजी दुपारी त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी जाहीर केले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा आणि विवाहित दोन मुली असा परिवार आहे. सुस्वभावी आणि धडाडीचा पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. करोनाच्या भीतीने त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दोन दिवसात तीन करोना बाधितांचा मृत्यूअंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात जिरेवाडी (ता.परळी) येथील 66 वर्षाच्या महिलेचा तर खतगव्हाण येथील 70 वर्षीय वृद्ध आणि भाटवडगाव (ता. माजलगाव) येथील 80 वर्षीय वृद्धेचा मृत्य झाला. अवघ्या 48 तासात तिघांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या 27 झाली. मंगळवारी नव्या 32 रुग्ण आढळून आल्याने करोना बाधितांची संख्या आता 603 झाल्याने जिल्ह्यात करोनाचा फास चोहोबाजुने आवळत असल्याचे चित्र दिसत आहे.