विरोधी पक्ष १५ वर्ष सत्तेवर होते. जनतेने त्यांची माजोरी अन मुजोरी पाहिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी कितीही यात्रा काढल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही. पुढची २५ वर्ष आम्हीच सत्तेत राहू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पाथर्डीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा १५ वर्षांचा सत्ताकाळ जनतेने पाहिला आहे. जनता त्यांना साथ देणार नाही. विरोधी पक्षांची अवस्था बुद्धू पोरांसारखी झाली आहे. अभ्यास करायचा नाही. नापास झाल्यानंतर पेन खराब झाला म्हणून कारणे द्यायची असे मुख्यमंत्री म्हणाले. २००४ पासून ईव्हीएमचा वापर सुरु झाला.

२०१४ पर्यंत महाराष्ट्रात देशात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी ईव्हीएम खराब नव्हते का? मग भाजपा जिंकायला लागल्यावर ईव्हीएम खराब कसे झाले? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. गोदावरी प्रकल्प योजनेच्या माध्यमातून मराठवाडा व पाथर्डी तालुक्यातील गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.