लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयाची पुनरावृत्ती आता महाराष्ट्रात करायची आहे. महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री करायचा आहे. जास्तीत जास्त आमदार भाजपाचे कसे निवडून येतील यासाठी प्रत्येक महिला पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. विधानसभा निवडणुकीतही महिलांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. केंद्र व राज्याने महिलांसाठी राबवलेल्या योजना महिला पदाधिकाऱ्यांनी घरोघर पोहोचवाव्यात. पक्षाने देशात सदस्य नोंदणी अभियानात २० कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा, चांगल्या कामाची दखल पक्ष नक्कीच घेतो, म्हणूनच महिलांना पक्षात नेता होण्याची चांगली संधी आहे, असे प्रतिपादन भाजपाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने श्रीमती रहाटकर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नगरमध्ये आल्या होत्या, त्या वेळी त्यांनी पक्ष कार्यालयास भेट दिली. त्या वेळी त्या बोलत होत्या. शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष गीतांजली काळे यांनी त्यांचा सत्कार केला. प्रदेश महिला सरचिटणीस उमा खापरे, राष्ट्रीय महिला संयोजिका उषा वाजपेयी, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, उपमहापौर मालन ढोणे, महापालिकेतील सभापती लता शेळके, नगरसेविका सोनाली चितळे, भिंगार छावणी मंडळाच्या सदस्य शुभांगी साठे आदिंसह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

श्रीमती रहाटकर यांनी कमल सखी संवाद, रक्षाबंधन उत्सव आदि संपर्क अभियान उपक्रमाची माहिती देऊन नगरमध्ये हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. प्रास्तविकात शहराध्यक्षा गीतांजली काळे यांनी सदस्य नोंदणी अभियानाची माहिती दिली. उपमहापौर ढोणे यांनी नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मंगलप्रभात लोढा यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या वेळी पदाधिकारी कालिंदी केसकर, निर्मला भंडारी, वंदना पंडित, सुरेखा विद्ये, सविता तागडे, ज्योती सैंदाणे, ज्योत्स्ना मुंगी, संगीता मुळे, कल्पना भळगट आदि उपस्थित होते.