प्रबोध देशपांडे

यावर्षी परतीचा पाऊस चांगलाच लांबणीवर पडला. या बदलेल्या वातावरणाचा सगळय़ाचा घटकांवर परिणाम झाला. कपाशी पिकांवर आढळून येणाऱ्या गुलाबी बोंडअळीच्या कालावधीमध्येही परिवर्तन झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणारा प्रादुर्भाव नोव्हेंबर महिन्यात दिसून येत आहे. सध्या गुलाबी बोंडअळीसाठी उष्ण व थंडीचे पोषक वातावरण तयार झाले असून, वेळीच उपाययोजना न केल्यास कापसाचा पुढील खरीप हंगामही धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

प्रारंभी गुजरातमध्ये आढळलेल्या गुलाबी बोंडअळीने २०१७ मध्ये महाराष्ट्रातील कापसाच्या पिकावर आक्रमण केले. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करण्यात आला. कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर झाल्याने विषबाधा होऊन अनेक शेतकरी व शेतमजुरांना आपले प्राणही गमवावे लागले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या जनजागृतीनंतर गत वर्षी गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावर्षी पुन्हा पेरणी झालेल्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा पाच ते १० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव फुलामध्ये ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडयात दिसून आला. खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या काळात पाऊस चांगला झाल्यामुळे पीक चांगले होते. मात्र, परतीच्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. काही भागामधे निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीमधे कापसाला फुले, पाते व बोंडे लागलेली आढळले. अशा पिकावर गुलाबी बोंडअळी आक्रमण करण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवडय़ामध्ये गुलाबी बोंडअळीचे पतंग आढळले आहेत. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सप्टेंबरच्या शेवटच्या, तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ामध्ये सरासरी २९ ते ३३ अं.से. तापमान असताना आढळून येते. यावर्षीचा परतीचा पाऊस लांबल्याने गुलाबी बोंडअळीसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून बाहेर निघाले आहेत. सध्या कोषातून बाहेर निघालेले पतंग मिलन होऊन अंडी टाकल्यानंतर आठ ते १० दिवसांनी त्यांचा प्रादुर्भाव कपाशीला हिरवे बोंडे व पात्या आहेत, अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती सर्वदूर कापूस पिकांमध्ये आढळून येऊ शकते. यावर नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाने उपाययोजना सूचवल्या आहेत.

जीवनचक्र खंडित होणे आवश्यक

वेळीच उपाययोजना न केल्यास प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. याचा प्रभाव पुढील वर्षांतील खरीप हंगामावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किडीचे जीवनचक्र खंडित न झाल्यास पुढील खरीप हंगामावर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून बाहेर निघाले आहेत. आठ ते १० दिवसांमध्ये प्रादुर्भाव होऊ शकतो. शेतकऱ्यांनी वेळीच सूचवलेल्या उपाययोजना कराव्या. डिसेंबरनंतर कापूस पीक पूर्णत: काढून टाकावे. कापूस फरदड घेण्याचा मोह टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे किडीचे जीवनचक्र खंडित होऊन पुढील खरीप हंगामामध्ये गुलाबी बोंडअळीवर प्रतिबंध करण्यास मदत होईल.

– डॉ. विलास भाले,

कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.