भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर प्रगत वैद्यकीय उपचार करण्यासाठी शुक्रवारी दुपारी त्यांना खास एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलविण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचे फॅमिली डॉक्टर अजय केनी, सून मेघा पानसरे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार पानसरे यांना मुंबईला नेल्याचे सांगण्यात आले.
कॉ. गोविंद पानसरे व उमा पानसरे या दाम्पत्यावर १६ फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला होता. दोघांवर येथील एॅस्टर आधान येथील रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पानसरे यांच्या शरीरात तीन ठिकाणी गोळ्या घुसल्याने मान, कंबर व पायावर शत्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यापासून गेल्या चार दिवसात त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले होते. गुरूवारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आणखी काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार करणे गरजेचे होते. तसेच त्यांच्या फुफ्फुसाला सूज आली असल्याने त्यावर प्रगत उपचाराची गरज भासत आहे. या बाबी लक्षात घेऊन पानसरे यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय डॉक्टरांनी नातेवाईक व कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला.
या निर्णयाची माहिती शुक्रवारी सकाळी कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी अॅस्टर आधार हॉस्पिटलकडे धाव घेतली. कार्यकर्त्यांमध्ये पानसरे यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा सुरू होती. प्रकृती स्थिर असताना त्यांना मुंबईला का हलवले जात आहे, याची चिंताही त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. दुपारी साडे तीन वाजता एअर अॅम्ब्युलन्स येईपर्यंत कार्यकर्त्यांची तगमग वाढीस लागली होती. इस्पितळात दाखल झालेल्या कार्डे अॅम्ब्युलन्समधून पानसरे यांना उजळाईवाडी येथे विमानतळावरील एअर अॅम्ब्युलन्सकडे नेण्यात आले. तेथून पानसरे यांना सोबत घेऊन डॉक्टरांचे पथक मुंबईकडे रवाना झाले.
पानसरेंना घेऊन कार्डे अॅम्ब्युलन्स इस्पितळाबाहेर पडल्यानंतर कार्यकारी संचालक डॉ. उल्हास दामले यांनी याबाबतचे भाष्य केले. ते म्हणाले, पानसरे यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यापासून गेले ४ दिवस त्यांची प्रकृती चांगली असून सुधारणाही होत आहे. त्यांच्या फुफ्फसाला सूज आहे. प्रदीर्घ काळ कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज भासणार आहे. त्यांचे वय, प्रकृती, रक्तदाब, शस्त्रक्रियेनंतरचा अशक्तपणा या बाबी लक्षात घेता प्रगत वैद्यकीय उपचारांची गरज आहे. त्यासाठी त्यांना ब्रीच कॅण्डी इस्पितळामध्ये दाखल केले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 4:05 am