विदर्भातील प्रमुख रस्त्यांवर टोल गोळा करणारे बहुतांश कंत्राटदार राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपच्या नेत्यांशी जवळीक साधून असणारे आहेत, तर काही कंत्राटदारांचे सर्वच राजकीय पक्षांशी मधुर संबंध आहेत. मनसेने बुधवारी राज्यभर केलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर समोर आलेली ही माहिती टोल व राजकीय नेत्यांचे मेतकूट स्पष्ट करणारी आहे.
नागपूर ते औरंगाबाद, नागपूर ते अमरावती, नागपूर ते वर्धा व चंद्रपूर हे विदर्भातील सर्वाधिक वर्दळीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवरील बहुतेक टप्पे बीओटी तत्त्वावर तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांना ठिकठिकाणी टोल द्यावा लागतो. टोल वसुलीचे कंत्राटदार राज्य रस्ते विकास महामंडळाने नेमलेले आहेत. नागपूर-चंद्रपूर मार्गावर जामच्या पुढे असलेला टोल संपूर्ण बांधकाम खात्यात ‘केके’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंत्राटदाराकडे आहे. हा कंत्राटदार राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांचा विदर्भातला खास माणूस म्हणून ओळखला जातो. मंत्री विदर्भात आले की या कंत्राटदाराच्या जाहीराती माध्यमात झळकतात. टोल वसुलीचे हे कंत्राट १८ वर्षांसाठी आहे. विशेष म्हणजे एक वर्षांपूर्वी तयार झालेल्या या रस्त्यावर २६ ठिकाणी मोठे खड्डे असूनसुद्धा ही टोल वसुली बिनबोभाट सुरू आहे. याच रस्त्याचा पुढचा टप्पा भाजपशी संबंधित एका कंत्राटदाराला देण्यात आला आहे. भाजपच्या एका राष्ट्रीय नेत्याशी जवळीक साधून असलेल्या या कंत्राटदाराची वसुली आता लवकरच सुरू होणार आहे. मध्यंतरी शिवसेनेने या कंत्राटदाराच्या कामाच्या संदर्भात आंदोलन करताच वरिष्ठांकडून निरोप आले आणि आंदोलन मागे घेण्यात आले. याच कंत्राटदाराकडे नागपूर-अमरावती मार्गावर तिवसा जवळ केवळ ३ किलोमीटरचा रस्ता तयार करून दिल्याच्या बदल्यात टोल वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे. नागपूरच्या सभोवती तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्याच्या टोलचे कंत्राट दिल्लीच्या एका कंपनीकडे आहे. २००१ मध्ये महाराष्ट्रात दाखल झालेल्या या कंपनीचे सर्वच राजकीय पक्षांशी नजीकचे संबंध आहेत. राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमात या कंपनीकडून मोठी बिदागी हमखास दिली जाते.
मुंबईचे कंत्राटदार
अमरावतीच्या सभोवती बांधण्यात आलेल्या वळण रस्त्याचे; तसेच औरंगाबाद रस्त्याच्या टोल वसुलीचे काम मुंबईच्या एका कंपनीकडे आहे. सध्या कोल्हापूरकरांच्या संतापाला सामोरे जाणाऱ्या ही कंपनीही राजकीय जवळीक राखून आहे. याशिवाय मुंबईच्याच एका कंत्राटदाराला विदर्भात चार ठिकाणांच्या टोल वसुलीचे कंत्राट महामंडळाने दिले आहे. हा कंत्राटदार सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळात नेहमी वावरणारा व मुंबईत मंत्र्यांच्या दालनात हमखास हजेरी लावणारा आहे.