नागपूर : प्रादेशिक वनविभागाने एकीकडे शहरात ‘निसर्गानुभव’ उपक्रमाअंतर्गत गावकऱ्यांना मचाणवर बसण्याचा अनुभव दिला, तर त्याचीच पुनरावृत्ती गोंदिया जिल्ह्यातही ‘सेवा’ या संस्थेने वनविभागाच्या मदतीने घडवून आणली.

वनविकास महामंडळ गोंदिया व प्रादेशिक वनविभाग गोंदिया यांनी ‘सेवा’ या संस्थेने घेतलेल्या पुढाकाराला सहकार्य केल्याने मचाणावर बसण्याच्या अनुभवापासून वंचित गावकऱ्यांना हा आनंद घेता आला. जांभडी-दोडके-शेंडा ब्लॉकमध्ये गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. वन्यजीवांचा हा महत्त्वाचा भ्रमणमार्ग असून नागझिरा ते नवेगावला जोडतो. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे ते बफरक्षेत्र सुद्धा आहे. त्यामुळे या भ्रमणमार्गावर कायम नजर असणे वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. सातत्याने संनियंत्रण गरजेचे आहे. ३० एप्रिलला बुद्धपौर्णिमेनिमित्त या संपूर्ण परिसरात २५ ते ३० मचाणांवर वन्यजीवांविषयी कळवळा असणारे स्वयंसेवी सहभागी झाले. यात गावकऱ्यांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर होता. या संपूर्ण गणनेदरम्यान गावकऱ्यांनी अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन झाले.

बिबट, अस्वल, गवा, रानकुत्रे, सांबर, चितळ, चौसिंगा, नीलगाय आदी महत्त्वाचे वन्यप्राणी त्यांना दिसून आले. नागझिरा ते नवेगावला जोडणाऱ्या या भ्रमणमार्गातील वन्यजीवांच्या विविधतेमुळे हा संपूर्ण या क्षेत्राचे महत्त्व आणखी अधोरेखित झाले. या संपूर्ण आयोजनात गोंदियाचे उपवनसंरक्षक एस. युवराज, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पी.जी. नौकरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे, राठोड, जाधव, वनरक्षक डी.एस. पारधी, सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकर तसेच अविजीत परिहार, शशांक लाडेकर आदी वनपाल, वनरक्षक व सेवाचे सदस्य सहभागी होते.

वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन

मचाण गणना शास्त्रशुद्ध मानली जात नाही, पण संनियंत्रणाच्या अनुषंगाने ती महत्त्वाची मानली जाते. यातून वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येते. त्यांचा अभ्यास करता येतो. वन्यजीवप्रेमींची फळी तयार होते आणि लोहसहभागातून वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन चांगल्या पद्धतीने होऊ शकते.