किमान तापमानात सर्वत्र घट

पुणे : देशाच्या दक्षिणपूर्व भागांत चक्रीवादळ घोंगावत असताना महाराष्ट्रात मात्र रात्रीच्या किमान तापमानात पुन्हा घट होत असल्याने रात्रीचा गारवा जाणवू लागला आहे. सध्या थंडीसाठी अनुकूल स्थिती असून, तापमानातील घट कायम राहण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस राज्यात कोरडय़ा हवामानाची स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या काळात राज्यात सर्वदूर थंडीची चाहूल लागली होती. तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत घसरला होता. मात्र, चक्रीवादळांची मालिका सुरू झाल्यास ढगाळ हवामानाच्या स्थितीमुळे थंडी गायब झाली होती. गती आणि निवार या चक्रीवादळांचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवला. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिणपूर्व भागात नवे ‘बुरेवी’ चक्रीवादळ आहे. ते तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार असून, त्या भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही.

सध्या राज्यात कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे थंडीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. नोव्हेंबरच्या शेवटी सरासरीच्या तुलनेत ५ ते ७ अंश सेल्सिअसने वाढलेला तापमानाचा पारा आता सरासरीच्या आसपास आला आहे. त्यामुळे रात्री काही प्रमाणात गारवा जाणवतो आहे. दिवसाचे कमाल तापमानही बहुतांश ठिकाणी सरासरीच्या आसपास आहे.

तापमान सरासरीच्या जवळ

मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर आदी भागांत किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत खाली आला असून, पुणे, जळगाव, महाबळेश्वर, कोल्हापूर, नाशिक आदी भागातील तापमान सरासरीच्या आसपास आहे. कोकण विभागात मुंबईत सरासरीजवळ, तर रत्नागिरी येथे सरासरी इतकेच तापमान आहे. मराठवाडय़ात नांदेड, औरंगाबादमध्ये तापमान सरासरीच्या ०.१ ते २ अंशांनी अधिक आहे. विदर्भात वर्धा, गोंदिया, अमरावती येथील तापमान सरासरीच्या तुलनेत घसरले असून, तेथे रात्रीचा गारवा आहे. गुरुवारी गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.