नगर : माहिती व प्रसारण मंत्रालय व राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) ‘पराक्रम दिवसा’ निमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन लघुपट स्पर्धेत नगरच्या नीहार शंतनू भावे लिखित आणि दिग्दर्शित ‘आखिरी मुलाकात’ या लघुपटाला प्रथम क्रमांकांसह एक लाखाचे बक्षीस प्राप्त झाले.

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आयोजित या स्पर्धेत ‘नेताजी के सपने-उडान इंडिया की’ या विषयावर ३ मिनिटांपर्यंतच्या लघुपटांना आमंत्रित केले गेले होते. देशभरातील एकूण १ हजार ३४६ प्रवेशिकांमधून नीहारच्या लघुपटाला पहिल्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. नीहार व त्याच्या टीमने ही फिल्म केवळ दोन दिवसांत पूर्ण केली. याचे चित्रीकरण दिल्लीत करण्यात आले.

नीहारने या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद स्वत: लिहले आहेत. त्याबरोबरच त्याचा आवाजही दिला आहे.  या फिल्मचे दिग्दर्शन नीहार बरोबरच शौर्य नारायण याने केले आहे. कौतुकाची बाब म्हणजे नीहार बरोबरच या फिल्ममध्ये पार्श्वसंगीत देणारा प्रफुल्ल जाधव हा देखील नगरचा आहे.

नीहारने या आधी सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा सिनेमा’ या चित्रपटाचे लेखन केले आहे. तसेच त्याच्या ‘सोंग’ आणि ‘लिटिल बाय  लिटिल’ या लघुपटांना अंतरराष्ट्रीय महोत्सवातून गौरविण्यात आले आहे. नीहार भावे हा अ. ए. सोसायटीच्या भिंगार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका गीतांजली भावे व जिल्हा क्रिकेट संघटनेचे सहसचिव शंतनू भावे यांचा मुलगा आहे.