निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी आवर्तन सुरूच असून बुधवारी निळवंडे धरण निम्मे रिकामे झाले आहे. सायंकाळी निळवंडे धरणातील पाणीसाठा २ हजार ५५८ दलघफूपर्यंत कमी झाला होता.
निळवंडे धरणात या वर्षी ५ हजार २१२  दलघफू पाणीसाठा करण्यात आलेला आहे. २५ ऑक्टोबरला धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले होते, चार दिवसांच्या त्या आवर्तनात ३२८ दलघफू पाण्याचा वापर झाला. त्यानंतर २९ ऑक्टोबरपासून जायकवाडीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. जायकवाडीचे आवर्तन सोडतेवेळी धरणातील पाणीसाठा ४ हजार ८८४ दलघफू होता. आज सायंकाळी तो २ हजार ५५८ दलघफू झाला होता.
मागील सोळा दिवसांत निळवंडेतून जायकवाडीसाठी २ हजार ३२६ दलघफू पाणी सोडण्यात आले आहे, तर पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनासह निळवंडेतून आतापर्यंत २ हजार ६५४ दलघफू पाणी खर्ची पडले आहे. निळवंडे धरणाच्या गेटची कामे करावयाची असल्यामुळे धरणातील पाणीसाठा ६१० मीटर तलावांपेक्षा कमी पातळीवर आणण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे, त्यामुळे अजूनही पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ हे आवर्तन सुरू राहण्याची शक्यता आहे.