काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप सावंत यांच्या अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल झालेले माजी खासदार नीलेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनामध्ये न्यायालयाने सहा दिवसांची वाढ केली असून या प्रकरणी आता ९ मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यांना देश सोडून जाण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.
दरम्यान या घटनेतील अन्य चार आरोपींना मात्र चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
सावंत यांचे गेल्या २४ एप्रिल रोजी चिपळूण येथील त्यांच्या घरातून अपहरण करून मुंबईला नेऊन मारहाण केल्याचा गुन्हा नीलेश, त्यांचे अंगरक्षक मनिष सिंग, जयकुमार पिलाई, स्वीय सहाय्यक तुषार पांचाळ आणि कुलदीप उर्फ मामा खानविलकर यांच्याविरूध्द नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी नीलेश यांनी यापूर्वीच येथील जिल्हा न्यायालयातून हंगामी अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्याची मुदत आज संपल्याने त्यांना खेड येथील न्यायालयात हजर केले असता त्यावरील अंतिम युक्तिवादासाठी न्यायालयाने ९ मेपर्यंत मुदतवाढ केली. त्यामुळे नीलेश यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
निलेश राणे यांच्यासह या प्रकारामध्ये सहभागी असलेल्या अन्य चारजणांना मात्र चिपळूणच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सावंत यांची गच्छंती अटळ
फिर्यादी आणि एकेकाळचे राणे पिता-पुत्रांचे खंदे समर्थक असलेल्या सावंत यांच्या संदर्भात आधी हा वाद कौंटुबिक पातळीवर मिटवण्याची भाषा केलेल्या राणे यांनी, तो आता घरातील राहिला नाही, असे जाहीर केल्यामुळे सावंत यांची कॉंग्रेस पक्षातून गच्छंती अटळ मानली जात आहे. दुसरीकडे सावंत यांनीही, घडलेल्या प्रकारातील सत्यता तपासण्यासाठी नीलेश यांच्यासह आपली नार्को चाचणी करण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.