निवडणूक रणनीतीकार आणि संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असतानाच नारायण राणे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लाऊन फिरतील, असा चिमटा नीलेश राणे यांनी काढला आहे.

प्रशांत किशोर यांचा २०१४ मध्ये भाजपची निवडणूक रणनीती आखण्यामध्ये सहभाग होता. सध्या ते संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष आहेत. मंगळवारी प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीच्या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी ट्विट केले आहे. नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि प्रशांत किशोर यांचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की,’… आणि ते राजीनामे पण फाडून टाकायला सांगा, सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील सुद्धा.’

नीलेश राणे यांनी आणखी एका ट्विटमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. राहुल गांधी यांनी किमान वेतन देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र किमान वेतन म्हणजे नेमके काय, असा खोचक सवाल त्यांनी काँग्रेसला विचारला आहे.