गणपती बाप्पा मोरया म्हटल्याने माफी मागणारे एमआयएमचे नेते आणि आमदार वारिस पठाण यांच्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे. हे फक्त भारतात होऊ शकतं, हेच कोण मुस्लिम देशात हिंदू मुस्लिमांबद्दल बोलला असता तर २४ तासात ठार मारला गेला असता, असे त्यांनी म्हटले आहे.

एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी २३ सप्टेंबरला गणपती बाप्पा मोरया म्हणत गणपती तुम्हा सगळ्यांची दुःखं दूर करो असे म्हटले होते. मात्र त्यांच्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी माफी मागत यापुढे आपण कधीही गणपती बाप्पा मोरया म्हणणार नाही. माझी चूक झाली असे म्हणत समस्त मुस्लिम बांधवांची माफी मागितली. त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी यासंदर्भातला व्हिडिओ पोस्ट केला होता.

यावर निलेश राणे यांनी ट्विटरवरुन टीका केली. हे फक्त भारतात होऊ शकतं… हेच कोण मुस्लिम देशात हिंदु बोलला असता (मुस्लिम धर्मा बद्दल) तर २४ तासात ठार मारला गेला असता. ही लोक महाराष्ट्रात निवडुन येतात ह्या पेक्षा दुसरे दुर्दैव काय, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, वारीस पठाण यांनी माफी मागताना म्हटले होते की, काही दिवसांपूर्वी माझ्या तोंडून अशी काही वाक्ये निघून गेली त्याबद्दल मी अल्लाहची माफी मागितली आहे. मी पण एक माणूस आहे माझ्याकडून चूक झाली आहे. यापुढे पुन्हा कधीही असे घडणार नाही असेही आश्वासन त्यांनी दिले होते.