शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केले असून सत्तेत असताना गुलामासारखी वागणूक दिली असल्याचं म्हटलं आहे. तसंच भाजपाकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाल्याचंही ते म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या या टीकेवर भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच शिवसेनेची सवय असल्याची टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “संजय राऊत म्हणतात भारतीय जनता पक्षाने एकत्र सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिली पण शिवसेना गुलामगिरी सहन करत नाही. पाच वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता उपभोगली, खाल्लेल्या ताटात थुंकणे हीच सवय शिवसेनेची कायम राहिली आहे. काही तरी लाज शिल्लक असू द्या रे”.

संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून जळगावमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, “राज्यात भाजपासोबत सत्तेत असताना शिवसेनेला गुलामासारखी वागणूक देण्यात आली. शिवसेनेला दुय्यम स्थान देत संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना पाच वर्ष सत्तेत असतानाही प्रत्येक गावातून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला”.

“भाजपाने शिवसेनेला गुलामासारखी वागणूक दिली आणि…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेच पाच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहणार असल्याचं सांगत वाटाघाटी झाल्याचे दावे फेटाळून लावले. “शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही, ही बांधिलकी आहे. असं मी रोखठोक मध्ये म्हटलेलं आहे. कारण, आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसं इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील”, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.