अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मंगळवारी (११ ऑगस्ट २०२० रोजी) सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणीदरम्यान  महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे. सोबतत निलेश राणे यांनी एका फोटोच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या फोटोत एक व्यक्ती पडद्याआड लपून पाहत असल्याचं दिसत आहे.

निलेश राणे यांनी फोटो शेअर करताना, “आदित्य यांची सध्याची परिस्थिती” अशी कॅप्शन दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंह मृत्यू प्रकऱणाशी संबंध असल्याचे दावे केले जात आहेत. याप्रकऱणी कोणीही जाहीर भाष्य केलेलं नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरेंचं नाव जोडणाऱ्यांना हिंमत असेल तर जाहीरपणे नाव घ्या असं आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत बाजू मांडली होती. या सर्व पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी फोटो पोस्ट करत आदित्य यांच्यावर मोजक्या शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

हे ट्विट करण्यापूर्वी निलेश यांनी ११ वाजून १७ मिनिटांनी केलेल्या अन्य एका ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात राजीनामा द्यावा लागेल असं म्हटलं होतं.  “उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे,” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

नक्की वाचा >> “सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी आदित्य आणि राऊत यांची नार्को टेस्ट करा सगळं सत्य समोर येईल”

आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं आहे?

आदित्य ठाकरे यांनी आपलं नाव जोडलं जात असल्याने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअऱ करत प्रतिक्रिया दिली होती. “मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून हे सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कधीही होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी संयमाने वागतोच आहे. अशा प्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कुणीही राहू नये.” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे