News Flash

पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल, तर तो अजित पवारांनीच; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

"अजित पवार गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?"

संग्रहित छायाचित्र

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सत्तेत आलेलं भाजपाचं सरकार तीन दिवसात कोसळलं होतं. या तीन दिवसांच्या सरकारवरून शिवसेना भाजपाला चिमटा काढताना दिसते. पहाटेच्या शपथविधीवरून शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला. शिवसेनेनं केलेल्या टीकेनंतर निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत शिवसेनेला उत्तर दिलं.

‘राज्यातील काही बडे पोलीस अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होते’ या विधानाची सध्या राज्यभर चर्चा आहे. हे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याचं म्हटलं जात होतं. पण, गृहमंत्र्यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यावर खुलासा करत ते विधान फेटाळून लावलं. या चर्चेवरून शिवसेनेनं पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत टीका केली.

शिवसेनेनं केलेल्या टीकेला निलेश राणे यांनी ट्विट करून उत्तर दिलं. राणे यांनी अजित पवार यांनी केलेल्या बंडाचा उल्लेख करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजपा-राष्ट्रवादीच्या शपथविधीवर टीका करते. अजित पवार हे पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच केला,” असं उत्तर निलेश राणे यांनी शिवसेनेला दिलं आहे.

काय म्हटलंय शिवसेनेनं?

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करीत फडणवीसांसह पोलीस अधिकाऱ्यांवर निशाणा साधला होता. “सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न करीत होते ते अधिकारी कोण? याहीपेक्षा काही झाले तरी भाजपचेच सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण, ते महत्त्वाचे. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले. फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली, पण विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र शपथ घेतलेले मुख्यमंत्रीच यापुढे कायम राहतील, जुनीच व्यवस्था पुढे चालू राहील असे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस व प्रशासकीय सेवेतले बडे अधिकारी ‘स्युमोटो’ नव्या सरकारची रंगसफेदी करण्याच्या आणि भेगा बुजवण्याच्या कामास लागले. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळय़ा पद्धतीने जाळय़ात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करीत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते, पण त्यांचे काहीच चालले नाही. फडणवीसांचे सरकार कोसळले व महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच. त्यामुळे या मंडळींचे मन खट्टू झाले,” असं म्हणत शिवसेनेनं काही पोलीस अधिकाऱ्यांना टोला लगावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 12:17 pm

Web Title: nilesh rane shivsena uddhav thackeray ajit pawar sharad pawar devendra fadnavis bmh 90
Next Stories
1 पुणे -सोलापूर महामार्गावर तीन भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू
2 स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत ‘सेम टू शेम’; कृषि विधेयकावरील शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपानं ठेवलं बोट
3 “बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते”
Just Now!
X