रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेना युतीचे उमेदवार म्हणून आपला विजय निश्चित असून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांनी स्वतची अनामत रक्कम वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोमणा युतीचे विद्यमान खासदार आणि भावी उमेदवार विनायक राऊत यांनी मारला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार येथील प्रस्तावित तेलशुध्दीकरण प्रकल्पाबाबत पुढील कार्यवाही स्थगित करण्याची घोषणा सोमवारी केली. त्याबद्दल खासदार राऊत यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे आभार मानले. मुख्यमंत्री शब्दाला जागणारे असून आम्ही बेसावध राहणार नाही, असेही राऊत यांनी नमूद केले.

यावेळी झालेल्या प्रश्नोत्तरांमध्ये, या निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी नीलेश राणे यांच्याशी होणा-या लढतीबद्दल विचारले असता, नीलेशनी डिपॉझिट वाचवण्याकडे लक्ष द्यावे, असा टोमणा मारत ही लढत एकतर्फी होईल, असे राऊत यांनी सूचित केले.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचे भाजपा जिल्हाध्यक्ष त्यांच्यावर नाराज आहेत, याकडे लक्ष वेधले असता, दोन्ही बाजूची नेतेमंडळी त्यावर तोडगा काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येथील संपर्क कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेच्या वेळी फटाके वाजवून आणि पेढे वाटून युती झाल्याबद्दल आणि नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेबद्दलचा आनंद शिवसनिकांनी व्यक्त केला.