हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्याचे चित्र पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल अनेक प्रश्नांना उत्तर देतानाच तुफान फटकेबाजी केल्याचे चित्र पहायला मिळालं. मात्र आता यावरुनच भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं?, असा प्रश्न निलेश राणे यांनी अजित पवारांना विचारला आहे.

अजित पवार यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत निलेश राणे यांनी अजित पवार यांना शेती करण्यासंदर्भातील त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. “तीन पक्षांचे सरकार आले आणि हाता तोंडचा घास गेल्याने दु:ख झालंय अशं आज अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करुन लपून बसता. बिन खात्याचे तीन महिने मंत्री राहण्याचा मानही तुमचाच. तुम्ही इतके दु:खात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात. त्याचं काय झालं?,” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.

काय घडलं होतं तेव्हा?

२०१९ साली राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या काही आठवडे आधीच सप्टेंबर महिन्यात अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विधान भवनात जाऊन आमदारकीचा राजीनामा सादर केला. हा राजीनामा  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लगेचच स्वीकृत केला. राजीनाम्यानंतर अजितदादांचा कुणाशीच संपर्क झाला नव्हता. या राजीनाम्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा आणि अजित पवार यांचे काका शरद पवार यांनी राजकारणी घसरणारी पातळी पाहून अजितने आपल्या मुलांनाही शेती करण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं होतं. “राजीनाम्यापूर्वी अजितदादांनी कोणाशीही चर्चा केली नव्हती. तसेच राजीनाम्यानंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने अस्वस्थ होते. यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे.  राजकारणाची पातळी घसरल्याने मुलांनाही त्यांनी शेती वा उद्योग करण्याचा सल्ला दिला. अजितदादांशी माझा अद्याप संपर्क झालेला नाही, पण त्यांच्याशी चर्चा केल्यावर नक्की अंदाज येईल. कुटुंबप्रमुख म्हणून  पवार कुटुंबामध्ये  माझाच शब्द अंतिम असतो. आमच्या कुटुंबात कोणतेही वाद नाहीत,” असं पवार म्हणाले होते.

नक्की वाचा >> मुंबई-पुणे एक्सप्रेस वे : “६ किमी अंतर कमी करण्यासाठी ६६०० कोटी रुपये खर्च करायची काय गरज होती?”

अजित पवार यांना अश्रू अनावर

त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळालं.  पत्रकार परिषदेत त्यांचा  सूर मवाळ होता. एरवी सडेतोड आणि आक्रमकपणे उत्तर देणारे अजितदादा भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. अजितदादांचे हे हळवे रूप महाराष्ट्राने पहिल्यांदाच बघितले. शरदरावांनी कुटुंबप्रमुख म्हणून चार गोष्टी सुनावल्यामुळेच अजितदादांना नरमाईची भूमिका घेत २९ सप्टेंबरला पुन्हा मुंबई गाठली. त्यानंतर या राजीनामा प्रकरणावर पडदा पडला.