27 January 2021

News Flash

शिवीगाळ करत निलेश राणेंनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर टीका; म्हणाले…

"तीन पक्ष एकटे लढले असते तर त्यांची..."

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी केलं. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड हे ४९ हजार मताधिक्याने विजयी झाले. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतिश चव्हाण ५८ हजार मताधिक्याने विजयी झाले. पाच पैकी चार जागांवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा विजय झाला आहे. या विजयामुळे आता पुन्हा एकदा राज्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असे आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. याच वादात आता भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंनीही उडी घेतली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी फार उड्या मारण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया निलेश यांनी दिली आहे. मात्र ही प्रतिक्रिया देताना त्यांनी राज्यात सत्तेत असणाऱ्या तिन्ही पक्षांसाठी अपशब्दाचा वापर केल्याचं ट्विटरवर दिसून येत आहे.

तीन पक्ष एकत्र येऊन दोन तीन सीट जिंकले म्हणजे त्यांना वाटलं त्यांनी मोठा पराक्रम केला. सोयीची आघाडी एखादी दुसरी निवडणूक जिंकून देईल पण तो विजय जास्त वेळ टिकत नाही. तीन पक्ष एकटे लढले असते तर त्यांची काय अवस्था झाली असती हे वेगळं सांगायला नको म्हणून त्यांनी उड्या मारायची गरज नाही, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे. मात्र ही टीका करताना निलेश राणेंनी या पक्षांसाठी अपशब्द वापरला आहे.

आणखी वाचा- ज्यांचा मुख्यमंत्री त्यांनाच भोपळा, मित्रपक्षांनीच…; नितेश राणेंचा टोला

अन्य एका ट्विटमध्ये निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेतृत्वात सातत्य नसल्याची टीका केल्याच्या बातमीवरही प्रतिक्रिया दिली आहे.  काँग्रेसवाल्यांनो सत्तेसाठी अजून किती स्वतःचा आणि स्वतःच्या नेत्याचा कचरा करून घेणार आहात. तुमच्या प्रमुख नेत्याला तुमचा सहकारी पक्ष किंमत देत नही म्हणजे सत्तेसाठी तुम्ही तुमच्या नेत्याची किंमत करत नाही असा अर्थ होतो, अशी टीका निलेश यांनी केली आहे.


तर दुसरीकडे भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “ठीक आहे आम्ही कमी पडलो, पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा…मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा..बाकी मैदानात परत भेटूच”, असं म्हणत नितेश राणे यांनी निशाणा साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 4:24 pm

Web Title: nilesh rane slams mahavikas aghadi after graduation constituency election result scsg 91
Next Stories
1 ज्यांचा मुख्यमंत्री त्यांनाच भोपळा, मित्रपक्षांनीच…; नितेश राणेंचा टोला
2 गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई
3 “भाजपाच्या नेत्यांना स्वप्नं पडतात की ‘ऑपरेशन लोटस’ करु, महाविकास आघाडीच्या आमदारांना…”; जयंत पाटलांचा टोला
Just Now!
X