शिवसेना – भाजपाची युती झाल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करत इतका फालतू माणूस  पाहिला नाही, अशी टीका केली आहे. या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राफेलवरुन भाजपावर टीकास्त्र सोडले होते.

स्वबळाची भाषा आणि राजीनाम्याची धमकी दिल्यानंतर शिवसेनेने अखेर भाजपाशी युती केली असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३ आणि भाजपा २५ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. युतीचा निर्णय झाल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बंडाचा पवित्रा घेतला असून, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह काही मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

नीलेश राणे यांनी ट्विटरवर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे दोन व्हिडिओ ट्विट केले. यातील एका व्हिडिओत उद्धव ठाकरे राफेल करारावरुन मोदी सरकारवर टीका करताना दिसतात. या व्हिडिओचा दाखला देत नीलेश राणे म्हणाले, इतका फालतू माणूस पाहिला नाही.

नीलेश राणे यांनी ट्विटरवर शिवसेनेवरील विनोद देखील शेअर केला आहे. आयुष्यात इतकही लाचार नका होऊ की, लोक तुम्हाला ‘उद्धव’ म्हणून हाक मारतील, हा विनोद त्यांनी रि-ट्विट केला आहे.

नीलेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेला लक्ष्य करत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख तर वाटत नाही पण उद्धव ठाकरे सरड्यांचे पक्षप्रमुख नक्की होऊ शकतात. जगातील सरडेदेखील उद्धव ठाकरेंची पलटी मालिका पाहून घाबरले असतील, अशा शब्दात त्यांनी युतीचा समाचार घेतला होता.