“रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले,” अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र, माजी खासदार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे विधान परिषदेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम नाराज असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना निलेश यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने रामदास कदम नाराज असून ते नेतेपदाचा राजीनामा देणार आहेत, अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या. याच पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी कदमांवर टीका केली आहे. ट्विटवरुन निलेश यांनी कदम नाराज असल्याची बातमी रिट्विट करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले. तुम्ही आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी किती निष्ठावान आहात हे दाखवायचा पण आज तुम्हाला उलट शिवी घालणार नाही कारण न घालता ती तुम्हाला बसलेली आहे,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.

शिवसेनेत खदखद….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मंत्री निवडताना राजकीय धक्कातंत्राचा वापर केला. ठाकरे यांनी शंकरराव गडाख व बच्चू कडू या दोन सहकारी पक्षांच्या आमदारांना शिवसेनेच्या वाटय़ाची मंत्रिपदे दिली, तर प्रथमच विधानसभेवर निवडून आलेले सुपुत्र आदित्य ठाकरे यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदावर संधी दिली. अनेक उत्सुकांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने शिवसेनेचे अनेक नेते व आमदार विस्तारित मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित नव्हते. मागील सरकारमध्ये शिवसेनेने दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, दीपक सावंत, तानाजी सावंत अशा विधान परिषदेवरील आमदारांना महत्त्वाची खाती दिली होती. मात्र यंदा शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारात दिवाकर रावते, रामदास कदम यासारख्या विधान परिषदेतील ज्येष्ठ नेत्यांना व माजी मंत्र्यांना ‘जय महाराष्ट्र’ करून निरोप दिला आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीपद न देण्याच्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयाबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.