25 November 2020

News Flash

“ठाकरे सरकार हे देशातले एकमेव राज्य सरकार असेल ज्यांनी…”; वीज बिलांवरुन भाजपा नेत्याचा हल्लाबोल

"...आणि सर्वात शेवटी कोमट पाणी प्या आणि स्वतःची काळजी घ्या"

फाइल फोटो

करोना टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्यांवर कोसळलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे. गुरुवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामान्यांना वाढीव वीज बिलातून थेट दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.  महावितरणच्या ६७ हजार कोटींच्या थकबाकीने राज्य सरकारची चिंता वाढविली असून, वसुलीसाठी नव्याने मोहीम राबविण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र ठाकरे सरकारने या बैठकीमध्ये थेट कोणतीच भूमिका न घेतल्याने भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आता ठाकरे सरकारलाच झटका देण्याची वेळ आली असून सर्वसामान्यांना सरकारी तिजोरीतील एक दमडीचाही फायदा न पोहचू देणारं देशातील हे एकमेव सरकार आहे, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.

नक्की वाचा >> “माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”

करोना टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्यांवर वाढीव बिलांची वीज कोसळली. लोकांमधील असंतोषाची दखल घेत वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र या सवलतीपोटी राज्य सरकारवर किमान दोन हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याने आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा निधी देण्याबाबत वित्त विभागाने आखडता हात घेतला. त्यामुळे ही सवलत देता येणार नसल्याची कबुली दोनच दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांना द्यावी लागली होती. त्यानंतर आता या वीज बिलांवरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. करोनाकाळातील वीजबिलांमध्ये सवलत देण्याचे जाहीर करून घूमजाव करणे, हा लाखो ग्राहकांचा विश्वासघात आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर विरोधकांच्या टीकेचे धनी ठरलेल्या ऊर्जामंत्र्यांनी भाजपवर प्रतिहल्ला चढवत, फडणवीस सरकारच्या काळात किमान सरासरी कार्यक्षमता न दाखविल्याने महावितरणची थकबाकी त्या पाच वर्षांत तिपटीने वाढल्याचा आरोप केला. सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष या वादामध्ये निलेश राणेंनीही उडी घेतली आहे. ट्विटरवरुन राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. लोकसत्ता डॉटकॉमची ‘झटका कायम! ठाकरे सरकारकडून वाढीव वीज बिलांमध्ये दिलासा नाहीच‘ ही बातमी शेअर करत राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “ठाकरे सरकारला झटका देण्याची वेळ आली आहे. देशातले एकमेव राज्य सरकार असेल ज्यांनी लोकांसाठी सरकारी तिजोरीतील एक दमडीचा फायदा थेट लोकांपर्यंत पोचवला नाही. सगळं जर-तर, किंतु-परंतु आणि सर्वात शेवटी कोमट पाणी प्या आणि स्वतःची काळजी घ्या,” असं म्हणत राणेंनी ठाकरे सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही गुरुवारी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने करोनाविरुद्ध लढण्यासाठी राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या लोगोमध्ये बदल करुन त्यात वीज बिलाचा फोटो टाकत, “माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”, असा सोमय्यांनी टोला लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 9:06 am

Web Title: nilesh rane slams thackeray sarkar over electricity bill issue scsg 91
Next Stories
1 “माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”
2 पालघर जिल्ह्यातील ‘थॅलेसेमिया’ग्रस्त संकटात
3 नियोजनाचे आव्हान
Just Now!
X