News Flash

“शिवसेनेची हालत वर्धापन दिनाच्या ‘या’ बॅनरसारखीच”, निलेश राणेंचा टोला!

भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर वर्धापन दिनाच्या बॅनरचा एक फोटो ट्वीट करून टीका केली आहे. तसेच, स्थानिक आमदार वैभव नाईक यांनाही लक्ष्य केलं आहे.

भाजपा नेते निलेश राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहीत छायाचित्र)

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांनी करोनाच्या संकटात एकत्र येण्याचं आवाहन केलं असताना दुसरीकडे भाजपाकडून मात्र शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेला लक्ष्य करणारे भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरवरून शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील त्यांनी शेलक्या शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. शनिवारीच सिंधुदुर्गमध्ये एका पेट्रोल पंपावर शिवसेना आणि राणेसमर्थक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगताना दिसू लागला आहे.

“वाईट बाळासाहेब ठाकरेंसाठी वाटतं”

भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एका बॅनरचा फोटो ट्वीट करून त्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “शिवसेनेचा वर्धापन दिनाचा बॅनर पण शिवसेना आमदार नाईकसारखा निघाला. एका तासात उलटा झाला. शिवसेना पक्षाची हालत पण या बॅनरसारखीच झाली आहे. वाईट वाटतं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी. त्यांनी पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन. संपणार कुत्र्यांमुळे”, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

 

नाईक आणि राणे समर्थकांमध्ये राडा!

निलेश राणेंच्या ट्वीटमध्ये शिवसेना आमदार वैभव नाईक यांना लगावलेल्या टोल्यासाठी शनिवारी सकाळी राणेसमर्थक भाजपा कार्यकर्ते आणि नाईक समर्थक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्गात झालेल्या राड्याची पार्श्वभूमी आहे. सिंधुदुर्गमध्ये एका पेट्रोलपंपावर शिवसेना आणि राणेसमर्थक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी एका पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल वाटायला सुरुवात केली. भाजपाला पेट्रोल दरवाढीवरून खिजवण्यासाठी हा प्रकार केल्याचं बोललं जात होतं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राणेसमर्थक भाजपा कार्यकर्ते तिथे पोहोचले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी आमदार वैभव नाईक देखील त्यामध्ये पडले होते, पण तेवढ्यात पोलिसांनी मध्ये पडत हा प्रकार थांबवला.

 

नितेश राणेंनी थेट संजय राऊतांना ऐकवलं!

नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. “शिवप्रसाद काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईकांना विचारावं. पोटभर दिलाय आज आमच्या कार्यकर्त्यांनी. पाहिजे असेल, तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये. टेस्ट आवडेल नक्की!” असं ट्वीट करत नितेश राणेंनी संजय राऊतांना देखील या ट्वीटमध्ये टॅग केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 8:34 am

Web Title: nilesh rane tweet on shivsena mla vaibhav naik shivsena vardhapan din 2021 uddhav thackeray speech pmw 88
Next Stories
1 देशात राष्ट्रद्रोह इतका स्वस्त होईल असे वाटले नव्हते; संजय राऊत मोदी सरकारवर संतापले
2 चांदोली धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांवर
3 बांधकाम १५ टक्क्य़ांनी महागले; स्टील, सिमेंट, वाळू, विटांची दरवाढ
Just Now!
X