कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीप सावंत यांच्या अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल झालेले माजी खासदार नीलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन खेड येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मात्र ते स्वत: आज न्यायालयात हजर नसल्याने पोलीस अटक करू शकलेले नाहीत.

दरम्यान या घटनेतील अन्य चार आरोपींना येत्या १२ मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सावंत यांचे गेल्या २४ एप्रिल रोजी चिपळूण येथील त्यांच्या घरातून अपहरण करून मुंबईला नेऊन मारहाण केल्याचा गुन्हा नीलेश, त्यांचे अंगरक्षक मनिष सिंग, जयकुमार पिलाई, स्वीय सहाय्यक तुषार पांचाळ आणि कुलदीप उर्फ मामा खानविलकर यांच्याविरूध्द नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी नीलेश यांनी जिल्हा न्यायालयातून हंगामी अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्याची मुदत ३ मे रोजी संपल्याने त्यांना खेड न्यायालयात हजर केले असता त्यावरील अंतिम युक्तिवादासाठी न्यायालयाने आजपर्यंत मुदतवाढ दिली होती. यातील अपहरणाच्या गुन्ह्य़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा जामीन फेटाळण्याचे आग्रही प्रतिपादन पोलिसांतर्फे सोमवारी सुनावणीवेळीे करण्यात आले. त्याबाबतचा युक्तिवाद मान्य करून नीलेश यांना देण्यात आलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला.अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्याने नीलेश यांना अटक होणे तांत्रिकदृष्ट्या अटळ असले तरी न्यायालयाच्या आदेशावर उच्च न्यायालयातून तातडीने स्थगिती मिळवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता व्यक्त आहे.