लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यात प्रभावी उपचार पद्धतीमुळे करोनावर मात करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्याात आतापर्यंत ४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. खामगाव येथील सामान्य रूग्णालयातून आज नऊ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. यामध्ये खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथील आठ व संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील एकाचा समावेश आहे.

बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ६९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. जळका भडंग व टुनकी येथील रुग्णांना मागील १० दिवसांपासून कुठलीही लक्षणे आढळून न आल्यामुळे त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. या सर्व रुग्णांना २१ मे रोजी दाखल करण्यात आले होते. यामध्ये चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे रुग्ण बरे झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला.

दरम्यान, आज प्राप्त झालेले ११ अहवाल नकारात्मक आले आहेत. ४६ नमुन्यांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १२८५ अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.आर.जी. पुरी यांनी दिली.