देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पिंपरी चिंचवड मधील नऊ शाळकरी मुलींनी यावर्षीचा प्रजासत्ताक दिन वेगळा आणि आठवणीत राहील असाच साजरा केला आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगात चढाईसाठी कोणताही मार्ग नसलेला कातळकडेचा खडतर तैलबैला किल्ला या नऊ मुलींनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय भवानी-जय शिवाजी’ चा जयघोष करत सर केला आहे. कातळकडेचा हा खडतर किल्ला नेहमीच गिर्यारोहकांना आकर्षित करत असतो. या मुलींनी हा कातळकडा सर करत भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला.

चेलूवी ढोकले, वैदही भोंगे , मानसी मगर, आकांक्षा पवार, श्रेया भदे आणि इतर चार विद्यार्थिंनींनी मिळून ही कामगिरी केली आहे. तैलबैला किल्ला सर करण्यासाठी गेली दोन महिने या मुली प्रशिक्षण घेत आहे. या विद्यार्थिनींना एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकळे गेल्या तीन वर्षांपासून प्रशिक्षण देत आहेत. शिवकाळात अस्तित्वात असणाऱ्या या किल्ल्याच्या पायऱ्या ब्रिटिशांनी नेस्तनाबूत केल्या. त्यामुळे कडा चढून हा किल्ला सर करण्याचं खडतर दिव्य गिर्यारोहकांना पार करावं लागतं. या नऊ मुलींनी लीड क्लाइम्ब, बिले देणे, रोप फिक्स करणे, इतर सदस्यांना वर घेणे आणि रॅपलिंग करत खाली येणे असा समन्वय साधत गड सर केला. या सर्व मुली ११ ते १५ वयोगटातील आहेत. या मुली निगडीच्या अमृता विद्यालयात शिकत आहेत.

तब्बल तीन तास चढाई करत या नऊ मुलींनी तिरंगा फडकवला. सोसाट्याचा वारा, बोचरी थंडी असं खडतर आव्हान या मुलींसमोर होतं. समुद्रसपाटीपासून हा किल्ला तीन हजार तीनशे फूट उंचावर आहे. किल्ला सर करण्यासाठी या मुलींची दोन गटात विभागणी करण्यात आली. किल्ल्यावर पोहचल्यानंतर सर्वांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी-जय शिवाजी चा जयघोष करत स्त्री शक्तीचा संदेश देत प्राजासत्ताक दिन साजरा केला. शिवकाळात तैलबैला किल्ला हा कोकणातून घाट माथ्यावर आणि आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी तसेच संदेश वाहक म्हणून ओळखला जात असे. सरस गड, घन गड, सुधा गड, सवासनी घाट, नवरा-नवरी सुळके यांचे विहंगम दृश्य या किल्ल्यावरून दिसते.