नीरा देवघर धरणातील पाणीवाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली. स्वार्थासाठी नीरा नदीचे पाणी १४ वर्षे बारामतीला पळवले आणि जमिनी लाटण्यासाठी लोकांना पाण्यापासून वंचित ठेवले, असा आरोप त्यांनी केला.

नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याबाबत अखेर राज्य सरकारने बुधवारी आदेश काढले. हे पाणी दुष्काळी भाग असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर जिल्ह्यातील  माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना आता मिळणार आहे. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली.  रामराजे निंबाळकर यांच्यावरही टीका केली. जमिनी लाटण्यासाठी लोकांना पाण्यापासून लांब ठेवले,  संबंधितांवर गुन्हे दाखल केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

काय होता मूळ करार

नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे ५७ टक्के, तर डाव्या कालव्याद्वारे ४३ टक्के पाणी वाटपाचे धोरण १९५४ साली ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्य़ातील फलटण तालुक्याला, तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातून बारामती, इंदापूर तालुक्यांना पाणी मिळत होते. मात्र, सन २००९ मध्ये राजकीय ताकद वापरुन शरद पवार आणि अजित पवार यांनी हा पाणी वाटपाचा करारच बदलला. त्यामध्ये नीरा देवघर धरणातून ६० टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती, इंदापूर तालुक्यांना आणि ४० टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा करार ३ एप्रिल २०१७ पर्यंत करण्यात आला होता. २०१७ मध्ये करार संपल्यानंतरही बारामती तालुक्याला बेकायदा पाणी दिले जात होते.