विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे हेलिकॉप्टर भरकटलं अशा बातम्या सुरु होत्या. वातावरणात बदल झाल्यामुळे सभेच्या ठिकाणी यायला वेळ झाला. आमचा संपर्क मी हेलिकॉप्टरमध्ये असल्यामुळे होत नव्हता. त्यामुळे विरोधकांना मजा वाटली होती. परंतु आम्ही एवढे निबर आहोत की, तुम्हाला या राज्याच्या सत्तेतून घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

दिवसाढवळ्या या मोदी सरकारने आपल्याला लुटले असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तन यात्रा काढली आहे. याला साथ द्या परिवर्तन नक्कीच होईल असा, विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.

मी पुराव्यानिशी १६ मंत्र्यांच्या ९० हजार कोटींचे भ्रष्टाचार बाहेर काढले. मग हा कोणता भ्रष्टाचार आहे, असा सवाल त्यांनी केला. पाच मंत्री पदासाठी स्वाभिमानी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज लाचार झाली आहे. लोकसभेत आणि महाराष्ट्रातही परिवर्तन होणार हे नक्की आहे. त्यामुळे या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.