मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुंबईच्या इतक्या जवळून चक्रीवादळ जाणार आहे. मुंबईपासून अवघ्या ११० किमी अंतरावर पालघरजवळ निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी ११५ ते १२५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा स्कायमेट या खासगी वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जनतेला सूचनांचं पालन करण्याचं तसंच खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना सूचनाही दिल्या आहेत. ते संपूर्ण परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत,” असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच सर्व नागरिकांनी खबदारी घ्यावी आणि प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं,” असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उद्या (३ जून २०२०) काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. केंद्रीय जल आयोगाने सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई आणि नाशिकमधील काही भागांमध्ये फ्लॅश प्लड (म्हणजेच अचानक मोठ्याप्रमाणात आलेला पाण्याचा प्रवाह) येण्यासंदर्भातील इशारा दिल्याचेही स्कायमेटनं म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये तसेच गुजरामध्येही उंच लाटा उसळतील असा इशाराही स्कायमेटनं दिला आहे.

२ जून रोजी संध्याकाळी पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळ तडाखा देईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफच्या १६ तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. ज्यापैकी तीन तुकड्या मुंबईत, प्रत्येकी दोन पालघर आणि डहाणूत तैनात करण्यात आल्या आहेत. दहा तुकड्यांना किनारी प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये नियुक्त करण्यात आलं आहे.

निसर्ग चक्रीवादळ तीन जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. “निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे.