निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आढावा घेतला जात असून पाहणीसाठी कोकण दौऱ्यावर पोहोचले आहेत. शरद पवार यांनी सर्वात आधी रायगड येथील माणगाव येथे पोहोचून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या. यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून शरद पवारांना परिस्थिती जाणून घेतली.
शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. ९ जूनला रायगड आणि १० जून रत्नागिरी जिल्ह्यातील भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा अदमास घेण्यासाठी व मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी आज कोंकण दौऱ्यास सुरुवात केली. माणगांव बाजारपेठ येथे खा. @SunilTatkare व पालकमंत्री @iAditiTatkare यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. pic.twitter.com/jeZ9qkfzzj
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 9, 2020
शरद पवार आज माणगाव, म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन येथील दौरा केल्यानंतर ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत.
दापोली येथे शरद पवार मुक्काम करणार आहेत. दिनांक १० जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत. निसर्ग या चक्रीवादळाचा तडाखा हा सर्वाधिक बसला तो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला. अनेक शेतकऱ्यांचं, आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकण दौरा केला. १०० कोटींची तातडीची मदत त्यांनी जाहीर केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा रायगड दौरा केला तेव्हा त्यानंतर लगेचच त्यांच्यात आणि शरद पवारांमध्ये एक तातडीची बैठक झाली होती. कोकणातल्या नुकसानग्रस्तांना पुन्हा कसं उभं करायचं यावर चर्चा झाली. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि इतर जिल्ह्यातील शेतीचं झालेलं नुकसान कसं भरुन काढायचं, तसेच कोकणातल्या फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा उभ्या करण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचं समजलं होतं. आता या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या कोकण दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2020 12:20 pm