हर्षद कशाळकर

तीन महिन्यांनंतरही रायगड जिल्ह्य़ातील निसर्ग वादळग्रस्तांना आणि बागायतदारांना अद्याप संपूर्ण मदत मिळालेली नाही. मदतवाटपाचा वेगही मंदावला आहे.

रायगड जिल्ह्य़ाला ३ जूनला निसर्ग वादळाचा तडाखा बसला. वादळात १ लाख ८३ हजार घरांची पडझड झाली. ११ हजार हेक्टर बागायतीचे नुकसान झाले. मच्छीमारांच्या बोटी आणि जाळ्यांचेही नुकसान झाले. राज्य सरकारने वादळग्रस्तांना वाढीव मदत देण्याची घोषणा केली. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. पण मदत वाटपाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. तर निधीच्या कमतरतेच्या अनेक तक्रारी आता पुढे येत आहेत.

घर, गोठे आणि झोपडय़ांच्या नुकसान भरपाईसाठी २४५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. या २२३ कोटी रुपयांचे वितरण आत्तापर्यंत करण्यात आले आहे. मात्र २२ कोटी २५ लाख रुपयांच्या मदतीचे वाटप बाकी आहे. मृतांचे नातेवाईक, जखमी व्यक्ती, कपडे- भांडी यासाठी अर्थसाहाय्य देण्यासाठी २४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी १९ कोटी ५९ लाख रुपयाच्या मदतवाटपाचे काम पूर्ण झाले आहे. १४ कोटी ७७ लाख रुपयांचे वितरण शिल्लक आहे.

वादळात नारळ, सुपारी आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. ११ हजार हेक्टरवरील बागा बाधित झाल्या होत्या. तर सहा हजार हेक्टरवरील शेतीचेही नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकरी आणि बागायतदारांसाठी ५७ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यापैकी ४८ कोटी १७ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. ९ कोटी १४ लाख रुपये अद्याप वितरित झालेले नाही.

आपद्ग्रस्त मच्छीमारांना वाढीव मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यासाठी ९४ लाख ५३ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ७० लाख ७५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. २३ लाख ७८ हजार रुपयांचा निधी अद्याप वितरित झालेला नाही.

उरण आणि महाड तालुके सोडले तर उर्वरित १३ तालुक्यांतील घरांच्या नुकसानीसाठी आलेल्या मदतीचे वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, माणगाव, मुरुड या पाच तालुक्यांतील मदतवाटपाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे अनेक वादळग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

अलिबाग, मुरुड, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, सुधागड येथील अनेक बागायतदार अजूनही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

केंद्रीय पथकाकडून आढावा

केंद्र सरकारच्या चार सदस्यीय पथकाने निसर्ग वादळग्रस्तांना सुरू असलेल्या मदतवाटपाचा फेरआढावा घेतला. पथकाने अलिबाग तालुक्यातील वरसोली, रेवदंडा परिसरात जाऊन मदतवाटप योग्य प्रकारे झाले अथवा नाही याची पाहणी केली. त्यानंतर रायगड आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मदतवाटपाचा आढावा घेतला.

निसर्ग वादळात आमच्या घराची मोठी पडझड झाली होती. शासनाने २५ हजार रुपयांची मदत देण्यात येईल असे सांगितले होते. प्रत्यक्ष सहा हजार रुपयेच मिळाले. तहसील कार्यालयात जाऊन मी वारंवार पाठपुरावा केला मात्र अद्याप उर्वरित रक्कम मिळाली नाही.

-विवेक पाटील, नुकसानग्रस्त, सागाव

घराची नुकसानभरपाई म्हणून सहा हजार रुपयांची मदत मिळाली. पण बागायतीची नुकसानभरपाईपोटी एकाही रुपयाची मदत मिळालेली नाही. तहसील कार्यालयाकडे विचारणा केली, पण ठोस उत्तर मिळाले नाही. मदत मिळेल एवढेच उत्तर दिले जाते.

– प्रणय घरत, वादळग्रस्त, चौल

मदतवाटपाचे काम पुढील आठ दिवसांत पूर्ण केले जाईल. सर्व तहसील कार्यालयांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

– निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड