राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १४ मार्च रोजीची नियोजित MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं आयोगाकडून जाहीर करण्यात आलं. या निर्णयावर परीक्षार्थींकडून तीव्र नापसंती आणि रोष व्यक्त केला जात असतानाच आता राजकीय नेतेमंडळींनी देखील विद्यार्थ्यांच्या बाजूने आपली मतं मांडायला सुरुवात केली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारला खोचक सवाल केला आहे. यासंदर्भात ट्वीट करून नितेश राणेंनी मत व्यक्त केलं आहे. “फक्त MPSC परीक्षेमध्येच करोना होणार… रात्रीच्या पार्टीमध्ये नाही???” असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.

“यांची मुलं परीक्षेला बसली नाही म्हणून…”

या ट्वीटमध्ये नितेश राणेंनी पुन्हा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. “MPSC च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या.. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चालले आहे. मुलांचे वय कसे कमी करणार? यांची मुलं परीक्षेला बसली नाही, म्हणून वाट्टेल ते निर्णय घेत आहेत!!! फक्त MPSC परीक्षेमध्येच करोना होणार..रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?” असं नितेश राणेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मनसेनं रात्रीच्या वेळी फेसबुक लाईव्ह करून बारमधील पार्ट्यांची आणि गर्दीची दृश्य दाखवली होती.

“लोकलमध्ये लाखो लोकांचा प्रवास”

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील या निर्णयावर तोंडसुख घेतलं आहे. “लोकलमध्ये लाखो लोक दाटीवाटीने प्रवास करतायत. अधिवेशनही झालं. काँग्रेसच्या आंदोलनात लाखो लोकं होते. वरळीत पब सुरू, परीक्षाही घेता आल्या असत्या…”, असं ट्वीट दरेकरांनी केलं आहे.

सत्ताधारी आमदारांचाही विरोध!

दरम्यान, एककडे विरोधकांकडून यावर निशाणा साधला जात असताना दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी देखील परीक्षा व्हाव्यात अशी भूमिका व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी परीक्षा होण्याच्या बाजूने ट्वीट करून भूमिका मांडली आहे. “यापुढं करोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता करोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढे जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच MPSC ची परीक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्रीसाहेब आणि अजितदादा, आपण याकडे लक्ष द्यावं ही विनंती!”, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

आणखी वाचा- परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये असं वाटत असेल तर…; उद्धव ठाकरेंचा जनतेला इशारा

“भाजप भयानक दांभिक पक्ष”

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र भाजपाकडून या मुद्द्यावरून राजकारण सुरू असल्याचं म्हटलं आहे. “MPSC परीक्षा व्हावी याकरता भाजपाचे गोपीचंद पडळकर बोलतात. MPSC ची परीक्षा होऊ नये म्हणून भाजपाचे विनायक मेटे बोलतात. भाजपा हा भयानक दांभिक आहे. मराठा विरुद्ध इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा हा भाजपाचा डाव आहे”, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

MPSC : पुण्यात विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक, परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ उतरले रस्त्यावर!