सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली डंपरमालकांच्या जमावाने हैदौस घातला. या जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयातील गेट तोडले, तसेच कार्यालयातील सामानाचीही नासधूस केली. यानंतर जमावाने गेट तोडून जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयातही घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच त्यांना रोखून धरले. दरम्यान, पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना ताब्यात घेतले आहे.
डंपर मालकांनी शनिवारी सकाळापासूनच त्यांच्या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईचा त्रास होत असल्याचे सांगत डंपर मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून दुपारच्या सुमारास सर्व डंपर मालकांचा जमाव नितेश राणेंच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून हा सर्व जमाव आत शिरला. दरम्यान, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही केला.