शिवसेनेच्या नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख हा कायम संभाजीनगर असा केला जातो. तसंच संभाजीनगर असं औरंगाबादचं नामकरण केलं जाईल असंही शिवसेनेने वारंवार सांगितलं आहे. मात्र महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात नामांतराचा कोणताही प्रस्ताव नव्हता. जर शिवसेनेने औरंगाबादचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेसचा त्याला विरोध असेल असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. यानंतर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला विरोध दर्शवला आहे. आता बघू बाळासाहेब ठाकरेंचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी या आशयाचं ट्विट करत नितेश राणेंनी टीका केली आहे.

नितेश राणेंनी काय म्हटलं आहे ट्विटमध्ये?

”काँग्रेसने सांगून टाकलं आहे संभाजीनगर होणार नाही! आता बघू… बाळासाहेब ठाकरेंचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी! संभाजीराजेंचा स्वाभिमान महत्त्वाचा की मुख्यमंत्रीपदाची खुर्ची ”

आजच बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामकरणाला विरोध दर्शवला आहे. शिवसेनेने असा काही निर्णय घेतला तर आम्ही त्याला विरोध करु असं बाळासाहेब थोरात यांनी सांगून टाकलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत औरंगाबादच्या नामांतरावरुन वादाची ठिणगी पडली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अशात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात ट्विट करुन बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की मुख्यमंत्रीपदाची खुर्ची असा प्रश्न आता विचारला आहे.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आल्यानंतर त्याला कॉंग्रेसचा विरोध असेल. किमान समान कार्यक्रमामध्ये नामांतरासारख्या बाबीचा समावेश नाही. अशा नामांतरामुळे सामान्यांचा विकास होतो असे आम्ही मानत नाही. केवळ नामांतरच नाही तर घटनेतील प्रास्ताविकेमध्ये दिलेल्या मूल्यांची प्रतारणा होईल अशा कोणत्याही कृतीस कॉंग्रेसचा विरोध असेल असे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीमध्ये सांगितले.