भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने युती झाल्याची घोषणा केली असली तरी सध्या त्यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे. यामुळे विरोधकांनी युतीवर टीका करण्याची संधी मिळाली आहे. आमदार नितेश राणे यांनी युतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन पहिली ठिणगी पडल्याचं सांगत भाजपा शिवसेना युतीवर टीका केली आहे. याला म्हणतात सत्तेसाठी नंगा नाच असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये विचारणा केली आहे की, ‘युती मध्ये पहिली ठिणगी कश्यामुळे ?? राम मंदिर..नाही !, शेतकरी ?… नाही !, नाणार रद्द ? .. नाही!, बेस्ट कामगार ? … नाही!!…मग कश्यासाठी ? मुख्यमंत्री आमचाच!!’. मुख्यमंत्रीदावरुन भाजपा शिवसेनेत सुरु असलेल्या या वादाला त्यांनी याला म्हणतात सत्तेसाठी नंगा नाच अशा शब्दांत टीका केली आहे.

भाजप-शिवसेना युतीची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात युतीची सत्ता आल्यावर पदे आणि जबाबदारीचे समसमान वाटप करण्याचे जाहीर केल्यानंतर संभाव्य मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेत लगेचच कलगीतुरा रंगला आहे.

मुख्यमंत्रिपद अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याचे युतीत ठरलेले नाही, असे विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात त्याबाबत सहमती झाल्याचे सांगत पाटील यांनी माहिती घेऊन बोलावे, असा सल्ला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पाटील यांना उद्देशून दिल्याने मुख्यमंत्रिपदावरून आधीच वाद रंगल्याचे चित्र आहे.

भाजप-शिवसेना युतीची घोषणा सोमवारी सायंकाळी झाल्यानंतर त्याच रात्री शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कोणाला कितीही जागा मिळाल्या तरी राज्यातील सत्ता समान कालावधीसाठी वाटून घेण्याचे ठरले, असे ट्वीट केले होते. तर सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला मुख्यमंत्रिपद आणि दुसऱ्या क्रमांकावरील पक्षाला उपमुख्यमंत्रिपद मिळेल, असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्रिपदावरून युतीत असलेला गुंता अधिकच वाढत आहे.