छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं बिडी उत्पादन करणाऱ्या पुण्यातील कंपनीविरोधात रोषाची भावना तयार होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं होत असलेलं उत्पादन थांबवण्याची मागणी केल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनीही याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नितेश राणे यांनी याविषयी ट्विट करून भाष्य केलं आहे.

संभाजी बिडी नावानं पुण्यातील कंपनी बिडी उत्पादन करते. या कंपनीकडून वापरल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला यापूर्वीही विरोध झालेला आहे. आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर थांबवण्याची मागणी केली. रोहित पवार यांच्या पाठोपाठ आमदार नितेश राणे यांनीही याविषयी भूमिका मांडली आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे. “संभाजी राजेंच्या नाव बिडी ला देण्याचे धाडस आपल्या महाराष्ट्रात होते इथेच आपण कमी पडलो! यांची आताच हिम्मत मोडली नाही तर उद्या अजुन वाढेल. एकदाच धूर निघाला पाहिजे. हर हर महादेव !!!,”असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले होते?

“छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा,” अशी मागणी रोहित पवार यांनीही केली होती.