रत्नागिरी येथे प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो नितेश राणेंनी केलेल्या आक्रमक ट्विटमुळे नाणार प्रकल्पग्रस्तांसाठी निवृत्त मुख्य सचिव द.म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापण्यात आली आहे. कोकणातील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाला शिवसेना आणि भाजपाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी विरोध केला आहे. अशातच नितेश राणे यांचेही आक्रमक आणि इशारा देणारे ट्विटच समोर आले आहे. नाणारसाठी कुठलीही समिती देवगड विजयदुर्ग या ठिकाणी पाऊल टाकेल तर जे काही घडेल त्याची जबाबदारी आमची नाही. आम्हाला चर्चा नकोच आहे. नाणार रद्द करा हीच आमची मागणी आहे. मग ही समिती कोणतं भजन करायला येणार आहे? आलीच तर आम्ही प्रसाद दिल्या शिवाय परत पाठवणार नाही असा ट्विट नितेश राणे यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड अर्थात आरआरपीसीएल च्या वतीने ग्रीन फिल्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर आणि संयुक्त अरब अमिरात चे राज्यमंत्री आणि एडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांच्या उपस्थितीत सामंज्य करार झाला आहे.

नाणार हा प्रकल्प झाला तर तो जगातला सर्वात मोठा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प ठरणार आहे. ही जवळपास ९० लाख कोटींची योजना आहे. मात्र रिफायनरी प्रकल्प झाला तर प्रदूषण होणार हे समीकरण ठरलेले आहे. त्यामुळे स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे काही हजार कलमांचे मालक असलेले शेतकरी एक दिवसात भूमीहिन होणार आहेत. या प्रकल्पग्रस्त भागात आंब्याची १२ लाख झाडं आहेत. तसेच नारळ, काजू यांचीही अनेक झाडं आहेत. भातशेतीचाही मोठा परिसर या प्रकल्पात जाईल त्यामुळे या प्रकल्पाला विरोध होतो आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane warns nanar committee on twitter
First published on: 25-09-2018 at 14:08 IST