राजकारण याचा अर्थ समाजकारण आणि विकासकारण असा आहे. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे त्याचा अर्थ सत्ताकारण असा घेतला जातो. राजकारणात चांगले लोक आले तर लोकतंत्र नक्कीच यशस्वी होते असे मत केंद्रिय मंत्री रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. राजकारणाला मर्यादा आहेत, त्यामुळे राजकारण्यांनी इतर गोष्टींत हस्तक्षेप करता कामा नये असेही ते पुढे म्हणाले. संमेलनाच्या उद्घाटनाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांना बोलावण्याचा निर्णय अतिशय उत्तम होता असेही ते म्हणाले.

गडकरी म्हणाले, साहित्याचे आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहे हे सांगताना त्यांनी काही दाखलेही दिले. जीवन उत्तम पद्धतीने जगायचे असेल तर साहित्य आवश्यक आहे. भारतीय समाजाला साहित्यिकांनी दिलेला प्रगल्भ दृष्टीकोन हा उत्तम ठेवा आहे. मूल्याधिष्ठीत जीवनपद्धती, शिक्षणपद्धती, संस्कृती ही भारतीयांसाठी देण आहे. कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीने आनंदानी आणि उत्साहात जगायला हवे. भारताची साहित्यपरंपरा मजबूत असल्याने आपण जगात कणखरपणे उभे आहोत. मतभिन्नता असण्यात हरकत नाही पण मनभेद असू नयेत असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. जातीवादाबाबतही गडकरी यांनी आपले मत नोंदवले. जात नाही ती जात, जातीवाद आपल्यामागे लागला आहे, मात्र वाईट गोष्टी कमी कशा होतील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणावरुन रंगलेल्या वादावर गडकरी यांनी थेट बोलणे टाळले. मात्र साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी साहित्य, शिक्षण, कला अशा कोणत्याच क्षेत्रात राजकारण्यांनी हस्तक्षेप करू नये असा टोला लगावला. जिथे संवाद होत नाही तिथे विसंदवाद होते, त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षेत्रातील मर्यादा पाळून आपले काम करत राहावे असेही ते म्हणाले.