|| शफी पठाण

संमेलनाच्या समारोपात नितीन गडकरी यांच्या कानपिचक्या

समाजाला दिशा दाखवण्यासाठी साहित्यिक, कलावंत, राजकारणी अशा सर्वच घटकांची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाला स्वायत्तता मिळायला हवी. विषय साहित्याचा असेल तर राजकारण्यांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असा सल्ला केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यास सरकारी हस्तक्षेप कारणीभूत असल्याचा आरोप होत असताना गडकरींनी अप्रत्यक्षपणे या विषयावर सूचक भाष्य केले. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे होत्या.

गडकरी पुढे म्हणाले, समाज अडचणीत असताना दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे यांनी पुढाकार घेतला आणि त्याला वैचारिक दिशा दिली; परंतु त्याबदल्यात राज्यसभेचे सदस्यत्व मागितले नाही. राजकारण्यांनीही अशाच निरपेक्ष भावनेतून काम करावे. आमच्या देशात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही मोठी समस्या आहे. मीच शहाणा आहे, अशी भावना समाजाचे नुकसान करू शकते. मी कधीही लोकांना मला मत द्या, असे म्हणत नाही. मी राजकारणी नाही. मंत्रिपद उद्या नसले तर कुणी मरणार नाही. राजकारणावर समाजाची दंडशक्ती असली पाहिजे. त्यासाठी लेखक, कलावंत, पत्रकार यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही गडकरी यांनी केले. यवतमाळ हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही ओळख पुसण्यासाठी शेतीच्या पारंपरिक चौकटीबाहेर पडून शेतीपूरक पर्यायी उद्योग शोधले पाहिजेत, असेही गडकरी म्हणाले.

समारोपास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, स्वागताध्यक्ष मदन येरावार, उद्घाटक वैशाली येडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर, सरकार्यवाह डॉ. इंद्रजीत ओरके, आयोजक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते उपस्थित होते.

समारोपालाही मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती

नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याने वाद उद्भवला. त्यामुळे उद्घाटन समारंभाकडे पाठ फिरवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी येतील असे सांगितले जात होते, पण ते आले नाहीत. ते समारोपाला तरी नक्की येतील, असेही आयोजक सांगत होते; परंतु समारोपाच्या मंचावर येण्याचेही मुख्यमंत्र्यांनी टाळलेच.

मळभ दूर व्हावे, नवे क्षितिज खुलावे – डॉ. ढेरे

या पिढीला मराठी भाषा आणि लिपीचे महत्त्व आपण समजावले पाहिजे. मराठीची समृद्ध संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी हे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या प्रेमापोटी या संमेलनात तरुणांची गर्दी आहे. आता बृहन्महाराष्ट्रातील मराठीच्या विकासासाठीही प्रयत्न केले पाहिजे. तेथील मराठी संस्थांना, वाचनालयांना महाराष्ट्र शासनाने मदत करावी, असे आवाहनही डॉ. ढेरे यांनी केले. संत साहित्य समाजाच्या सर्व स्तरांत पोहोचावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हय़ात झालेले हे संमेलन शेतकऱ्यांना जगण्याची नवी प्रेरणा देणारे ठरावे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.